भारतात राहणाऱ्या प्रत्येकाची हिंदू हीच ओळख आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत बोलले आहेत. आरएसएसकडून आयोजित ‘भविष्य का भारत’ कार्यक्रमाचा आज अखेरचा दिवस असून यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ‘भारतात राहणारे सगळेजण हिंदू आहेत. हे सांगायल ते घाबरतात. सर्व लोक आपलेच आहेत. आपली संस्कृती हीच आपली एकता आहे’, असं मोहन भागवत बोलले आहेत. तसंच आरएसएस कधीच आंतरजातीय विवाहाविरोधात नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी बोलताना त्यांनी हिंदुत्व म्हणजे समावेशकता आणि मुस्लीमांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लीमांना जागा नाही, असं होत नाही. जर आपण मुस्लीमांना स्वीकारत नसू तर ते हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे भारतीयत्व आणि सर्वसमावेशकता आहे, असे प्रतिपादन केले होते.

आधुनिक भारत हा राज्यघटनेवर आधारलेला असून देशातील प्रत्येक नागरिक घटनेला बांधला गेलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील राज्यघटनेला श्रेष्ठ मानतो आणि त्याच्या चौकटीत राहूनच काम करतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशी विचारांचा आधार घेऊन राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा समावेश केलेला नाही. हा विचार त्यांना भारताच्याच भूमीतून, बुद्धाच्या विचारातून मिळालेला आहे. कोणीही शत्रू नसून प्रत्येकाला बरोबर घेऊन मानवविकासाचा हा विचार आहे आणि याच मूल्यांचा संग्रह म्हणजे हिंदुत्व असल्याचा दावा भागवत यांनी केला.

राष्ट्रनीतीवर बोलणारच!
संघाचा प्रभाव वाढत असल्याने राजकारणाशी निगडित मुद्दय़ांबाबतही प्रभाव वाढला. मात्र, राजकारणात विविध पक्ष, त्यांची परस्परविरोधी मते असतात. संपूर्ण समाजाला जोडायचे असेल तर ‘राजकीय’ क्षेत्राच्या बाहेर राहूनच काम करावे लागते. त्यामुळे संघ राजकारण करीत नाही. संघाला कोणत्याही राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीत. पण राष्ट्रनीतीचा परिणाम देशातील सर्वावर होत असतो. त्यामुळे राष्ट्रनीती काय असावी यावर संघ विचार मांडणारच. म्हणूनच घुसखोरांच्या विषयावर संघाने उघडपणे मत व्यक्त केले आहे, असे स्पष्टीकरण भागवत यांनी दिले.

सत्ताकेंद्र एकच
देशाचे सत्ताकेंद्र दिल्लीतच असून ते नागपूरवरून चालवले जात नाही. पंतप्रधानांना वा केंद्र सरकारमधील मंत्र्यांना नागपूरवरून फोन करून राजकीय धोरणांवर अंकुश ठेवला जात नाही, असा दावा भागवत यांनी केला. स्वयंसेवकांनी कोणत्या राजकीय पक्षात जाऊन काम करायचे हे त्यांनी ठरवावे, पण ते अन्य पक्षांत जात नाहीत. ते का येत नाहीत याचा त्या पक्षांनी विचार करावा, असा ‘उपदेश’ भागवतांनी बिगरभाजप पक्षांना केला.

महिलांना बरोबरीचेच स्थान
स्त्रीला शक्तीरूप मानले असले तरी देशात आचार आणि आचरण यात फरक दिसतो. अनेक बाबतीत महिला पुरुषांपेक्षा सशक्त असल्याचे दिसते. तिला बरोबरीचे स्थान द्या, असे भागवत म्हणाले.

नागपुरातून चालत नाही सरकार, कधीच फोन करत नाही
‘आम्ही कधीही स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्यास सांगत नाही. मात्र राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला नक्की देतो. आरएसएस राजकारणापसून दूर राहतं, मात्र राष्ट्रहितावर त्यांची भूमिका असते’, असं मोहन भागवत बोलले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everyone who lives in india is hindu by identity
First published on: 19-09-2018 at 18:42 IST