भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आठ शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर या अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टरचा वायुसेनेत समावेश करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टर्सची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. या हेलिकॉप्टरचा भारतीय वायुसेनेत समावेश करण्यात आल्याने भारतीय वायुसेनेची क्षमता आणि ताकद आता कैकपटीने वाढणार आहे. जाणून घेऊयात या हेलिकॉप्टरची खास वैशिष्ट्ये…

>
अमेरिकेचे अपाची एएच-६४ हे जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते. १९९१ साली सद्दाम हुसेनच्या इराककडून कुवेत मुक्त करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय फौजांनी ‘ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ या कारवाईत सुरुवातीला अपाची हेलिकॉप्टर वापरून इराकी रडार-संरक्षण यंत्रणा निष्प्रभ केली. त्यामुळे त्यापुढे लढाऊ विमानांना हल्ले करणे सुलभ झाले. या युद्धात जमिनीवरील हल्ल्यात २७७ अपाची हेलिकॉप्टर वापरली गेली आणि त्यांनी इराकचे ५०० हून अधिक रणगाडे आणि अन्य लष्करी वाहने नष्ट केली.

>
अमेरिकेच्या ह्य़ूज कंपनीने बनवलेल्या अपाचीच्या पहिल्या प्रारूपाचे उड्डाण १९७५ साली झाले आणि लष्कराने ते १९८२ साली स्वीकारले. अमेरिकी सैन्यदलांत १९८६ पासून अपाची हेलिकॉप्टर सामील होऊ लागली. त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी त्यापूर्वीच्या सिकोस्र्की यूएच-६० ब्लॅक हॉक आणि एसएच-६० सी-हॉक या हेलिकॉप्टरचेच जनरल इलेक्ट्रिक टी-७०० टबरेशाफ्ट इंजिन अपाचीसाठी वापरले होते. इंजिनाच्या भोवताली बसवलेल्या खास आवरणामुळे त्यातून बाहेर पडणारे गरम वायू थंड केले जातात. त्यामुळे उष्णतावेधी क्षेपणास्त्रांचा मारा चुकवण्यास मदत होते.

>
अपाची दिसायला गुंतागुंतीचे हेलिकॉप्टर असले तरी त्याची रचना युद्ध आघाडीवर वापरास आणि देखभालीस सोयीची केली आहे. त्याचे पंखे २३ मिमी व्यासाच्या कॅननच्या माऱ्यातून बचावू शकतात आणि कॉकपिट १३ मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने खाली कोसळले तरी वैमानिकाचा बचाव करू शकते.

>
अपाचीवर ३० मिमी व्यासाची चेन-गन आहे. ती मिनिटाला ६२५ गोळ्या झाडू शकते. त्यासह हायड्रा-७० रॉकेट, स्टिंगर, हेलफायर आणि साइडवाइंडर ही क्षेपणास्त्रे बसवता येतात.

>
ही शस्त्रे वैमानिक त्याच्या हेल्मेटवर बसवलेल्या खास प्रणालीद्वारे त्याची नजर वळेल त्या दिशेने वळवून डागू शकतो. अपाची ताशी २९३ किमी वेगाने २५० किमी प्रवास करू शकते. त्याची अपाची एएच-६४ डी लाँगबो ही सुधारित आवृत्ती बोइंग कंपनीने, ब्रिटनच्या सहकार्याने १९९२ साली तयार केली. अपाची लाँगबो हेलिकॉप्टर ताशी ३५२ किमी वेगाने ४७६ किमी अंतरावर हल्ले करू शकते. आता भारतीय वायूसेनेमध्ये या हेलिकॉप्टर्सचा समावेश झाला आहे.

(टीप- मूळ लेख ‘लोकसत्ता’च्या ‘गाथा शस्त्रांची’ सदराअंतर्गत २५ सप्टेंबर २०१८ रोजी छापून आला होता. हा लेख सचिन दिवाण यांनी लिहिला होता.)