23 January 2020

News Flash

Timeline: कुलभूषण जाधव कोण आहेत? आणि काय आहे हे प्रकरण?

३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी कुलभूषण यांना अटक केली

कुलभूषण जाधव

पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) आज (बुधवार) निकाल देणार आहे. हा निकाल आपल्या बाजूने लागेल अशी भारताला आशा आहे. पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आयसीजेकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना आयसीजेने मे २०१७ मध्ये जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच या प्रकरणासंदर्भात याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी ‘आयसीजे’ समोर आपली बाजू मांडली होती. त्यानंतर ‘आयसीजे’ने आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. आज अखेर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. पण हे प्रकरण नक्की आहे तरी काय आणि नक्की काय काय झाले आतापर्यंत या प्रकरणामध्ये यासंदर्भातील घेतलेला आढवा

> कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारतातील रॉ साठी काम करत असल्याचा दावा पाकने केला होता. कुलभूषण जाधव हे पाकमध्ये हेरगिरी करत होते, असा आरोपही पाकने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकचे म्हणणे होते.

> कुलभूषण जाधव हे मुंबईतील माजी सहायक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पूत्र आहेत. ते नऊ वर्षांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाले होते. कुलभूषण यांचे कुटुंबीय पवई येथील हिरानंदानी भागात राहतात.

> कुलभूषण जाधव यांच्या अटकेच्या महिनाभरानंतर पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी जाधव यांचा एक व्हिडिओ जाहीर केला. यात जाधव हे रॉचे एजंट असल्याची कबुली देताना दिसत होते. कराची आणि बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांसाठी जाळे तयार केल्याची कबुली त्यांनी दिल्याचा दावा पाकने केला होता.

> ४८ वर्षीय कुलभूषण जाधव हे नौदलातील अधिकारी होते. १४ वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली. २००३ मध्ये ते निवृत्त झाल्याचा दावा भारताने केला होता.

> कुलभूषण जाधव यांनी १९८७ मध्ये एनडीएत प्रवेश केला. १९९१ मध्ये ते भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी शाखेत सामील झाले.

> निवृत्ती स्वीकारल्यानंतर कुलभूषण जाधव यांनी इराणमधील चाबहार बंदरमधून आयात- निर्यातचा व्यवसाय सुरु केला. कुलभूषण जाधव यांच्याकडे हुसैन मुबारक पटेल या नावाने पासपोर्टही होता. २००३ मधून पुण्यातील पासपोर्ट शाखेतून त्यांनी हा पासपोर्ट मिळवला होता.

> जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले होते. ते नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत, मात्र त्यांच्याशी सरकारचा संबंध नाही, असे भारताने म्हटले होते. जाधव यांचा पाकिस्तानमधील वास्तव्याचा कोणताही पुरावा देण्यात आला नाही, याकडे भारताने लक्ष वेधले होते.

> पाकिस्तानमधील ‘फील्ड जनरल कोर्ट मार्शल’मध्ये कुलभूषण जाधव यांच्याविरोधात खटला चालला. हेरगिरी आणि घातपाती कारवायांचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी पाकमधील लष्करी न्यायालयाने १० एप्रिल २०१७ रोजी कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवले.

> जाधव यांना पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले होते. तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आंतरराष्ट्रीय न्यायलयाने फाशीला स्थगिती दिली होती. या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये, असे न्यायालयाने पाकला बजावले होते. सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी या प्रकरणात बाजू मांडली होती.

> २०१७ साली डिसेंबर महिन्यामध्ये २२ महिन्यांनतर कुलभूषण जाधव यांची आई अवंती जाधव व पत्नी चेतनकूल जाधव यांच्याशी पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या आघा शाही येथील पार्किंग लॉटमध्ये असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये भेट झाली. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना काचेच्या पलीकडून भेटण्याची परवाणगी देण्यात आली होती. यावेळी जाधव यांनी बंद काचेच्या खोलीमधून स्पीकरच्या माध्यमातून त्यांच्या आई व पत्नीशी संवाद साधला होता. यावेळी जाधव यांच्या आईनं अवंती जाधव यांनी मुलासाठी भेटवस्तू आणली होती, परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ती भेटवस्तू कुलभूषण यांना दिली नाही.

> १८ फेब्रुवारी २०१९ ला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी ‘आयसीजे’ समोर आपली बाजू मांडली होती. चार दिवस चाललेल्या या सुनावणीदरम्यान ‘आयसीजे’ने आपला निर्णय सुरक्षित ठेवत निकाल १७ जुलै रोजी देणार असल्याचे सांगितले होते.

First Published on July 17, 2019 11:07 am

Web Title: everything you want to know about kulbhushan jadhav case and its timeline scsg 91
Next Stories
1 अविवाहित मुलीने मोबाइल वापरल्यास वडिलांना होणार १.५ लाखांचा दंड
2 शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांचा आदर्श घ्या: अमोल कोल्हे
3 लँडिगपूर्वी विमानात होतं केवळ 5 मिनिटांचं इंधन; टळली मोठी दुर्घटना
Just Now!
X