हिंदूंचे प्राबल्य असलेल्या वसाहतींमध्ये मुस्लिमांना घर अथवा मालमत्ता खरेदी करण्यापासून रोखावे, मुस्लिमांनी घर घेतलेले असल्यास ते रिक्त करण्यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत द्यावी आणि त्यानंतर जबरदस्तीने घरात घुसून ते घर रिक्त करावे, असा सूचनावजा आदेश विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी येथे एका जाहीर सभेत दिल्याने देशभर खळबळ माजली आहे. तोगडिया यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून होऊ लागली असून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. निवडणूक आयोगाने तोगडिया यांच्या भाषणाची सीडी मागविली असून त्यानंतर त्याबाबत योग्य निर्णय घेण्याचा पवित्रा घेतला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र तोगडिया यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे, तर संघ परिवाराशी संबंधित अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामापासून दूर ठेवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
भावनगरमधील मेघानी सर्कल परिसरात शनिवारी झालेल्या जाहीर सभेत तोगडिया यांनी वरील वादग्रस्त वक्तव्य केले. बहुसंख्य स्थानिक कार्यकर्ते आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते या सभेला मोठय़ा प्रमाणात हजर होते. मुस्लिमांचे घर रिक्त करण्यासाठी ४८ तासांची मुदत द्या, अन्यथा जबरदस्तीने घरात घुसून ती मालमत्ता रिक्त करा, मालमत्तेची आंतर-समुदाय विक्री करण्यास प्रतिबंध करणारा कायदा गुजरातमधील अनेक शहरांमध्ये लागू आहे, त्यामुळे येथेही त्याच कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करा, असेही या वेळी तोगडिया म्हणाले. राजकीय पक्षांवर दबाव टाकण्यासाठी निवडणुका ही योग्य वेळ असते. त्यामुळे भाजप अथवा काँग्रेसवर दबाव टाकण्यास कोणत्याही स्थितीत कचरू नका, असे आवाहनही या वेळी तोगडिया यांनी केले.
आपची मागणी
विशिष्ट विभागांत मालमत्ता खरेदी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) नेते प्रवीण तोगडिया एका मुस्लीम उद्योगपतीला लक्ष्य करीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने (आप) केला आहे. निवडणुकीच्या काळात तोगडिया शांततेचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही आपने केली आहे. भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेले असतानाही अशा प्रकारचे कृत्य करणे घटनाविरोधी आहे त्यामुळे तोगडिया यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने त्वरित द्यावेत, अशी मागणी पक्षाने एका निवेदनाद्वारे केली आहे.

एका उद्योजकाला धमकाविण्यासाठी?
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार  एका मुस्लीम उद्योजकाच्या घराबाहेर तोगडियांनी निदर्शने करीत दोन दिवसांत घर खाली करण्याची त्याला धमकी दिली. घर सोडले नाहीत तर माझे समर्थक हुसकावून लावतील. नंतरची कायदेशीर लढाई कित्येक वर्षे चालेल, असा इशारा तोगडियांनी दिल्याचा आरोप आहे.

मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. संघटनेला बदनाम करण्यासाठी माध्यमांनी जाणीवपूर्वक अपप्रचार चालवला आहे.
प्रवीण तोगडिया

तोगडिया यांनी केलेल्या वक्तव्याची सीडी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामधील वक्तव्य ऐकल्यानंतर कोणती कारवाई करावयाची त्याचा निर्णय घेण्यात येईल.
–  पी. के. सोळंकी , जिल्हाधिकारी, भावनगर