भारतातील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांच्या (ईव्हीएम) साहाय्याने ‘घोटाळा’ करण्यात आल्याचा दावा सय्यद शुजा या हॅकरने केला असतानाच या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे देखील उपस्थित असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या असून काँग्रेसने या प्रकरणावर मौन बाळगले आहे.
इंडियन जर्नालिस्ट्स युनियनने (युरोप) आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत सय्यद शुजा या हॅकरने ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येऊ शकते, असा दावा केला होता. या पत्रकार परिषदेत शुजा स्काइपच्या माध्यमातून पडद्यावर झळकला असला, तरी त्याचा चेहरा झाकण्यात आला होता. ईव्हीएमचे डिझाइन तयार करून ती विकसित करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ईसीआयएल) या सार्वजनिक उपक्रमातील एका चमूचा आपण भाग होतो, असा दावा त्याने केला होता. हा घोटाळा रोखणाऱ्या आपल्या चमूतील काही सदस्यांची हत्या करण्यात आल्यामुळे भीती वाटून २०१४ साली आपण भारतातून पळून आल्याचे त्याने म्हटले होते.
शुजा याच्या या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे देखील उपस्थित असल्याचे आता समोर आले आहे. कपिल सिब्बल हे वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन जिथे उभे होते, त्याच्या मागे खुर्चीवर बसले होते. कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपानेही काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
‘शुजा याच्या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल यांची उपस्थिती हा गंभीर विषय आहे. सिब्बल तिथे अनावधानाने पोहोचले नाही. त्यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तिथे पाठवले होते. भारतीय लोकशाहीची प्रतिमा मलीन करण्यासाठी सिब्बल तिथे गेले होते’, असा आरोप मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 11:03 am