२१ बॅलेट युनिट, २१ कंट्रोल युनिटही नादुरुस्त

लोकसभा निवडणूक निर्विघ्न पार पडावी म्हणून जिल्हा प्रशासनाने एक महिन्यापासून सतत तयारी करून, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊनही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत विलंब झाला. यामुळे अनेकांना मतदानापासूनही वंचित राहावे  लागले. २१ बॅलेट युनिट, २१ कंट्रोल युनिट तर ३८ व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या.

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी २०६५ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सर्व मतदान केंद्रावर मॉक ड्रिल करण्यात आले. त्यावेळी यंत्रे व्यवस्थित काम करीत होती. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी विविध मतदान केंद्रावर १६ बॅलेट युनिट, ८ कंट्रोल युनिट तर ३८ व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला.

रामटेक लोकसभा मतदारसंघात २३६४ केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. येथील विविध मतदान केंद्रावर मॉक ड्रिलच्या वेळी २९ बॅलेट युनिट , २९ कंट्रोल युनिट तर ३८ व्हीव्हीपॅट मशीन खराब असल्याचे समोर आले. तर प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी  २४ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट व २६ व्हीव्हीपॅट मशीन बिघडल्याचे समोर आले. तक्रार आल्यावर सर्व मशीन बदलण्यात आल्या. मात्र, बदलण्याच्या प्रक्रियेत वेळ गेला. तोपर्यंत मतदान प्रक्रिया थांबवण्यात आल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. काहींनी कटाळून मतदान न करण्याचा निर्णय घेतला. त्यात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांचा समावेश होता. त्यांना केवळ काही काळासाठीच मतदानासाठी वेळ देण्यात आला होता.

मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी दिशानिर्देश दिले जाते व ते पालन करणे जिल्हा प्रशासनाला बंधनकारक असते. मनुष्यबळाचा अभाव आणि इतरही सामुग्रीची कमतरता असताना जिल्हा प्रशासन शक्य होईल तेवढे प्रयत्न करते. मात्र, त्यानंतरही उणिव भासते. त्याचाच परिपाक ईव्हीएम,व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड होण्यात झाला आहे. एखाद्या केंद्रावर ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्यास ते बदलवण्याची प्रशासकीय प्रक्रिया किचकट आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार पोहोचल्यावर गोदामातून नवीन यंत्र पाठवले जाते. ते केंद्रावर पोहोचेपर्यंत मतदान प्रक्रिया थांबते. यामुळे केंद्रापुढील रांगा वाढते. अनेकांना वेळ नसल्याने ते मतदान न करताच परत जातात. आज शहरात ठिकठिकाणी असे चित्र दिसून आले.

दुपापर्यंत १७ तक्रारी प्राप्त झाल्या. तेथे नवीन यंत्र देण्यात आले. त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.     – अश्विन मुगद्ल, जिल्हाधिकारी, नागपूर.