News Flash

मतदार यादीतील घोळामुळे नागरिकांचा संताप

भर उन्हात महिला, ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप

डिप्टी सिग्नलमधील मतदान केंद्रावर मतदानासाठी लागलेली रांग.

भर उन्हात महिला, ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप

शहरातील अनेक मतदार केंद्रांवर मतदार यादीतील घोळामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. आपले नाव शोधायसाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हात फिरावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्येही बिघाड निर्माण झाल्याने मतदारांना रांगेतच ताटकळत राहावे लागले.

पश्चिम नागपुरातील अनेक मतदान केंद्रात मतदार यादीत घोळ असल्याचे दिसून आले. अनेक वर्षांपासून एकाच बुथवर मतदान करणाऱ्यांची नावे यावेळी मात्र दुसऱ्याच केंद्रावर होती. त्यामुळे मतदाराला धावपळ करावी लागली. तरीही कडक उन्हात मतदारांचा उत्साह मात्र कायम होता.

सकाळी आठ वाजता पांढराबोडी आणि रामनगर परिसरातील बुथ केंद्रावर एकच गर्दी होती. वाढत्या तापमानाच्या पूर्वीच मतदान करून घेण्याचा बेत अनेकांनी आखलेला दिसला. पश्चिम नागपूरच्या राम मंदिरासमोर असलेल्या भारत विद्यालयात भल्या मोठय़ा दोन रांगा होत्या. मात्र, व्हीव्हीपॅट पद्धतीमुळे मतदानाची प्रक्रिया संथगतीने होत असल्याने नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली. याच भागातील महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत अपंगांसाठी कुठलीही सोय दिसून आली नाही. मतदार यादीचाही घोळ कायम होता. नाव न दिसत असल्यामुळे काहींनी कंटाळून मतदान केले नाही.

मात्र, मतदार यादीत नाव नसलेल्या केतकी कस्तुरेने तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने आपले नाव शोधून मतदान केले. ९० वर्षीय भाग्रता सायरेने कोणाचाही आधार न घेता मतदान केले. बिजलीनगर येथील महापालिकेच्या कलादालन शाळेत प्रथमच मतदानाचा हक्क बजवणारा मुकुल सोमलवार कमालीचा उत्सुक होता.  फ्रेन्डस् कॉलनी येथील फ्रेन्डस् कॉन्व्हेंटमध्ये खोली क्रमांक १०२ आणि १०३ मध्ये जवळपास एक तास ईव्हीएम बंद होते. झिंगाबाई नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र छोटे असल्याने मतदारांची रांग थेट रस्त्यावर आली आणि नागरिकांना भर उन्हात रांगेत उभे राहावे लागले. गोलदी येथील बालाजीनगरात आशीर्वाद शाळेत मतदारांसाठी चांगली सोय करण्यात आली होती. थंड पाणी आणि मंडप टाकलेला होता.ज्येष्ठांसोबतच युवा महिलांचीही संख्या मोठी होती.

बीप ऐकू येत नसल्याच्या तक्रारी

मध्य नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलच्या केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्र ईव्हीएम मशीनशी संलग्न होत नव्हते. दुरुस्ती केल्यावर ७.१५ ला मतदान सुरू झाले. गांजाखेतच्या स्वातंत्र्यवीर मगनलालजी बागडी वाचनालयाच्या केंद्रात मतदारांना मतदान यंत्राची बीप ऐकू येत नसल्याच्या तक्रारी होत्या, परंतु येथे पंख्याचा आवाज जास्त असल्याने हा प्रकार घडत असल्याचे पुढे आले. हंसापुरीतील केंद्रात मॉकपोलला विलंब झाल्यामुळे मतदान विलंबाने ७.३० वाजता सुरू झाले.  महालच्या जामदार स्कूलमध्ये यंत्रात बिघाड आल्याने ७.३० वाजता मतदान सुरू झाले.

वाठोडा, सतरंजीपुरा, वर्धमाननगरात मतदार परतले

मंगळवारीतील, वाठोडा, सतरंजीपुरा, वर्धमाननगर, देशपांडे लेआऊट, डिप्टी सिग्नल या भागातील विविध मतदान केंद्रावर मतदार याद्यांचा घोळ बघायला मिळाला. वाठोडा शक्तिमाता माता नगर येथील बारलिंगे कुटुंबातील सात सदस्य ओळखपत्र घेऊन मतदानासाठी आले. मात्र, त्यांचे नाव यादीत नव्हते. त्यांनी बुथवर चौकशी केली. मात्र, जुन्या व नवीन याद्या बघितल्यावर त्यात नाव दिसले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करत ते परत गेले. सतरंजीपुरा येथील महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर एका सत्तर वर्षीय व्यक्तीजवळ ओळखपत्र होते आणि बुथवर त्यांचे नाव होते मात्र, मतदान केंद्रातील यादीत नाव नव्हते. त्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागले. मंगळवारीतील आझाद शाळेत मारोतराव कळमकर यांच्या नावावर मतदान करण्यात आले, मात्र त्यांचे गेल्यावर्षी निधन झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

पतीच्या जागी सासऱ्याचे नाव

मध्य नागपूरच्या दोन मतदान केंद्रात निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत चक्क चार महिलेच्या पतीच्या जागी सासऱ्याचे नाव नमूद आल्याचा प्रकार पुढे आला. या महिला मतदानासाठी सकाळी आठ ते नऊच्या सुमारास केंद्रात आल्या असतानाही त्यांना विविध कागदपत्रासह नियमांचा आधार सांगत दुपारी तीनपर्यंत ताटकळत ठेवले गेले. चंद्रकला श्रावण हेडाऊ, वसंतराव पंचन पोटभरे, श्यामदेवराव लेंडे, सलब्बी अब्दूल नबी यांनी ही तक्रार केली. हे केंद्र मध्य नागपूरच्या स्वातंत्र्यवीर मगनलालजी बागडी वाचनालय, गांजाखेत आणि मोमिनपुरातील एका केंद्रात आहे. या चारही महिलांची नावे गेल्या निवडणुकीत बरोबर होती, परंतु यंदा हे सर्व मतदान करण्यासाठी केंद्रात गेल्यावर त्यांच्या पतीच्या जागी त्यांना सासऱ्याचे नाव बघून धक्काच बसला. त्यांनी आपले ओळखपत्र दाखवत मतदान करू देण्याची विनंती केली, परंतु ओळखपत्र व नावात साम्य नसल्याचे पुढे आले. केंद्रातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क केला. वरिष्ठांनी विविध कागदपत्रांसह एक वेगळा फार्म भरून मतदानाबाबतच्या सूचना संबंधित केंद्राला दिल्या, परंतु त्यासाठी विलंब लागण्याची शक्यता बघत या महिलांना दुपारी तीननंतर बोलावण्यात आले.

दिवंगत व्यक्तींची नावे यादीत

मध्य नागपूरच्या सर्वच भागात मतदान यादीत  बराच घोळ असल्याचा प्रकार पुढे आला. हंसापुरीतील एका मतदान केंद्रात ऑक्टोबर २०१८ मध्ये काजीज सिशांत सिद्धीकी या तरुणाने नवीन मतदान नोंदणीसाठी अर्ज दिला. त्याला निवडणूक आयोगाकडून भ्रमणध्वनीवर संदेशही आला, परंतु मतदानाच्या वेळी त्याचे नाव यादीत नव्हते. मोमिनपुऱ्यात शाहिना अंजुम अब्दुल रफीक शेख आणि तांडापेठ परिसरात गिरधारी हेडाऊ या व्यक्तीलाही दुपारी तीनपर्यंत त्याचे नाव यादीत सापडत नव्हते. दरम्यान, यादीत रामकृष्णा निनावे, रामकृष्णा बेलवाले, श्यामराव टुंगरेसह इतरही बऱ्याच दगावलेल्या व्यक्तींची नावे असल्याचे पुढे आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 12:46 am

Web Title: evm not working
Next Stories
1 आचारसंहितेच्या काळात आतापर्यंत ८८ लाखांची रोकड जप्त
2 पथनाटय़ कलाकारांची दररोज हजार रुपयांची बेगमी
3 Lok Sabha Election 2019 : पहिल्या टप्प्यात आंध्रात हिंसाचार, दोन ठार, अनेक ठिकाणी ईव्हीएमसोबत छेडछाड
Just Now!
X