माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांचे मत

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) ही संपूर्णपणे विश्वासार्ह असल्याचे ठासून सांगतानाच, कागदी मतपत्रिकांच्या जुन्या पद्धतीकडे वळण्याचा कुठलाही प्रयत्न ‘प्रतिगामी’ ठरेल, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एस. कृष्णमूर्ती यांनी सोमवारी व्यक्त केले.

मतपत्रिकांद्वारे मतदानात घोटाळा केला जाऊ शकतो, त्यामुळे कागदाचा अपव्यय होतो आणि निवडणुकीच्या निकालांनाही त्यामुळे विलंब होतो, असे त्याचे अनेक तोटे असल्याचे कृष्णमूर्ती म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ही ‘देशाची शान’ असून ती पूर्णपणे विश्वासार्ह आहेत. काही राजकीय पक्षांनी मतपत्रिकांची पद्धत पुन्हा सुरू करण्याची मागणी करणे दुर्दैवी असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

केवळ काही पक्षांनी निवडणुकीत चांगली कामगिरी केली नाही, याचा अर्थ ईव्हीम यंत्रे वाईट आहे असा नव्हे. ही यंत्रे मागे घेण्यात आल्यास माझ्या मते ते प्रतिगामी पाऊल ठरेल. माझ्या मतानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे विश्वासार्ह आहेत, असेही कृष्णमूर्ती म्हणाले.

मतपत्रिकांच्या पद्धतीमुळे सर्व निवडणूक निकाल जाहीर होण्यास कदाचित एक आठवडाही लागू शकेल, असे सांगून कृष्णमूर्ती म्हणाले की, यामुळे कागदाचाही मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. मतपेटय़ांमध्येही मोठा घोटाळा होऊ शकतो. काही निवडणुकांमध्ये बोगस मतपत्रिकांचा वापर झाल्याचेही आपल्याला ठाऊक आहे. ईव्हीएमप्रमाणे देखरेख व नियंत्रण ठेवण्याचा पर्याय पारंपरिक मतपेटय़ांच्या पद्धतीत उपलब्ध नाही. शिवाय मतपत्रिकांच्या बाबतीत अवैध मतांची शक्यताही वाढते, याचा कृष्णमूर्तीनी उल्लेख केला.