इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये छेडछाड करणे शक्य नाही, त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बुधवारी स्पष्ट केले. भारतातील राजकीय पक्ष पुन्हा जुन्या पद्धतीने बॅलेट पेपरने (मतपत्रिका) मतदान घेण्याची मागणी करत असतात. त्या पार्श्वभूमीवर सुनील अरोरा यांचे हे विधान महत्वपूर्ण आहे. टाइम्स नाऊ समिटमध्ये ते बोलत होते.

निवडणूक सुधारणा आणि आदर्श अचारसंहितेसंदर्भात विविध राजकीय पक्षांसोबत लवकरच चर्चा करणार असल्याचे अरोरा यांनी सांगितले.

गाडी आणि पेना प्रमाणे ईव्हीएममध्ये बिघाड होऊ शकतो. पण त्यात छेडछाड शक्य नाही. गेल्या २० वर्षांपासून मतदान यंत्राने मतदान सुरु आहे. त्यामुळे बॅलेट पेपरकडे पुन्हा वळण्याचा प्रश्नच येत नाही असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.