एमसीएक्स स्टॉक एक्स्चेंजला परवानगी देताना नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत सेबीचे तत्कालिन अध्यक्ष सी. बी. भावे आणि सेबीचे माजी सदस्य के. एम. अब्राहम यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी नोंदविण्याच्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कृतीवर माजी प्रशासकीय अधिकाऱयांनी तीव्र टीका केली आहे.
भावे आणि अब्राहम यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर कसालाही डाग नसल्याचे देशाचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक विनोद राय यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय दक्षता आयुक्त एन. विठ्ठल म्हणाले, सीबीआय खूपच वादग्रस्त निर्णय घेते आहे. त्यामुळे या संस्थेचे प्रतिष्ठा धोक्यात आलीय.
माजी कोळसा सचिव ई. ए. एस. शर्मा अशा पद्धतीने अधिकाऱयांना त्रास देणे अत्यंत दुर्दैवी आहे. जर त्यांनी काही चुकीचा निर्णय घेतला असेल, मात्र, त्यामागे कोणताही छुपा उद्देश नसेल, तर त्यांना अशा पद्धतीने त्रास द्यायला नकोय. देशातील प्रामाणिक अधिकाऱयांच्या पाठिमागे खंबीरपणे उभी राहणारी व्यवस्था तयार करायला हवी, असाही सल्ला त्यांनी दिला.
जिग्नेश शहा प्रवर्तित एमसीएक्स स्टॉक एक्स्चेन्जबाबत कारवाई करतानाच विभागाने शहा यांच्याविरुद्धही तक्रार दाखल केली आहे. एमसीएक्स स्टॉक एक्स्चेन्जला सेबीने २००८ मध्ये मान्यता देताना नियमांचे पालन केले नाही, असे याबाबतच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.