मुलीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक, शेजाऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी कळवण्याऐवजी एक जोडपे तब्बल महिनाभर मुलीच्या मृतदेहासोबत रहात होते. वाराणसीच्या हाथियाफाटक भागात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दिलावर खान असे मृत मुलीच्या वडिलांचे नाव असून ते निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. सोमवारी सकाळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मृत्यूचे नेमके कारण समजून घेण्यासाठी आम्ही झीनतच्या (३०) शवविच्छेदन अहवलाची वाट पाहत आहोत. आम्हाला अजून कोणाकडून तक्रार मिळालेली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासंबंधी निर्णय घेतलेला नाही अशी माहिती मिर्झापूरचे पोलीस अधिकारी पी.एस.पांडे यांनी दिली. दिलावर पत्नी आणि मुलगी झीनतसोबत हाथियाफाटक येथील घरात राहत होता.

दिलावरला अन्वर आणि आफताब ही दोन मुले असून ती अलीगड येथे स्थायिक आहेत. मागच्या तीन वर्षांपासून दोन्ही मुले वडिलांच्या घरी आलेली नाहीत. झीनतचा महिन्याभरापूर्वीच मृत्यू झाला आहे असे स्थानिकांनी सांगितले. झीनतच्या मृत्यूनंतर आठवडयाभराने आम्हाला मृतदेहाची दुर्गंधी जाणवत होती. आम्ही पोलिसांना याबद्दल माहिती दिली. जेव्हा पोलीस तपासासाठी यायचे तेव्हा दिलावर त्यांना सर्च वॉरंट घेऊन या असे सांगून परत पाठवायचा असे शेजाऱ्यांनी सांगितले.