उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील सेक्टर १६८ मध्ये ३ सप्टेंबर रोजी रिक्षाचालक इस्राफील याच्या हत्येचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात इस्राफीलची माजी प्रेयसी आणि तिच्या सध्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. माजी प्रेयसीने इस्राफील याला भेटायला बोलावून पुन्हा एकदा त्याच्याकडे परतण्याचं खोटं सांगितलं आणि फसवून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करुन त्याची हत्या केली.

पोलिस अधिकारी अजयपाल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्राफील हा बिहारच्या कटिहार येथील रहिवासी होता. तो नोएडामध्ये बरोला गावात राहून रिक्षा चालवायचा. जवळपास चार वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये इस्राफील याची मुजफ्फरपुर येथील सायरासोबत ओळख झाली होती. त्यावेळी इस्राफील याचा मित्र रहिम हा देखील त्याच्यासोबत होता. लवकरच इस्राफील आणि सायरा यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र, दोन वर्षांपूर्वी इस्राफीलचं दुसऱ्या महिलेसबत लग्न झालं. हे कळल्यानंतर सायराने रहिमसोबत जवळीक वाढवली आणि दोघांमध्ये प्रेमाचं नवं नातं तयार झालं.

रहिम आणि सायरामधील हे प्रेमसंबंधांमुळे इस्राफील संतापला होता. त्यामुळे सायराला फोन करुन तो धमकावत असे. त्याच्या धमक्यांमुळे त्रासलेल्या सायराने रहिमला बिहारमधून बोलावून घेतलं. तो 31 ऑगस्ट रोजी ट्रेनने दिल्लीमध्ये आला. दोघांनी मिळून इस्राफीलचा काटा काढण्याचा कट आखला. त्यानुसार 2 सप्टेंबर रोजी रहिम आणि सायरा मेट्रोने नोयडाला रवाना झाले. रहिम गोल्ड कोर्स आणि सायरा सिटी सेंटर स्थानकांवर उतरले. सिटी सेंटर येथे ठरल्याप्रमाणे इस्राफील सायराची वाट पाहत होता. त्यानंतर सायरा आणि इस्राफील दोघं रिक्षाने सेक्टर १६८ मध्ये पोहोचले. याठिकाणी झुडपांच्या मागे जावून सायराने इस्राफीलसोबत प्रेमाचं नाटक केलं आणि त्याला फसवून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. त्याचवेळी जवळच लपलेला रहिम बाहेर आला आणि दोघांनी मिळून चाकूने सपासप वार करुन इस्राफीलचा गळा कापला.

इस्राफीलची हत्या केल्यानंतर दोघं रिक्षा घेवून एडवांट इमारतीत पोहोचले. तेथून दुसरी रिक्षा पकडून रहिम दिल्ली विमानतळावर पोहोचला आणि विमानाने बिहारला निघून गेला, व सायरा स्वतःच्या घरी निघून गेली. घटनेचा तपास करताना पोलिसांनी प्रथम रहिमला बेड्या घातल्या होत्या, त्यानंतर सायरालाही अटक करण्यात आली आहे.