बिहारच्या मुझफ्फरपूरमधील निवारागृहात मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर व इतर १८ जणांना दिल्ली न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ कुलश्रेष्ठ यांनी ठाकूर याला पॉक्सो कायद्यानुसार दोषी ठरवले असून सदर निवारागृह बिहार पीपल्स पार्टीचा माजी आमदार ठाकूर हाच चालवत होता. न्यायालयाने एका आरोपीला सोडून दिले असून इतर अठरा जणांना दोषी ठरवले आहे. शिक्षेच्या युक्तिवादासाठी न्यायालयाने २८ जानेवारीची तारीख निश्चित केली आहे. ३० मार्च २०१९ रोजी याबाबत न्यायालयाने आरोप निश्चित केले होते. त्यात ठाकूर याच्यावर बलात्कार व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार व गुन्हेगारी कटाचा आरोप होता.

ठाकूर व निवारागृहाचे कर्मचारी तसेच बिहार सरकारच्या समाज कल्याण खात्याचे अधिकारी यांच्यावरही गुन्हेगारी कटाचा आरोप ठेवण्यात आला होता. मुलींवरील लैंगिक अत्याचाराची माहिती न कळवणे, कर्तव्यात कसूर करणे असेही आरोप त्यांच्यावर होते. बाल न्याय कायद्यानुसारही अनेक गुन्हे यात दाखल करण्यात आले होते. ३० सप्टेंबर २०१९ रोजी न्यायालयाने सीबीआय वकील व वीस आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केले होते. त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता.

टाटा समाज विज्ञान संस्थेने बिहार सरकारला तेथील निवारागृहांच्या पाहणीनंतर २६ मे २०१८ रोजी सादर केलेल्या अहवालात लैंगिक  अत्याचाराचे हे प्रकरण उघड झाले होते.

प्रकरणाची राजकीय पार्श्वभूमी

या प्रकरणात ठाकूर याचे बिहारच्या माजी समाज कल्याण मंत्री व जनता दल संयुक्तच्या नेत्या मंजू वर्मा यांच्या पतीशी घनिष्ठ संबंध होते असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मंजू वर्मा यांनी ८ ऑगस्ट २०१८ रोजी राजीनामा दिला होता.  नंतर हेप्रकरण ७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुझफ्फरपूरच्या स्थानिक न्यायालयातून दिल्लीतील साकेत जिल्ह्य़ातील पॉक्सो न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वर्ग करण्यात आले होते.