ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरिधर गमांग यांनी शुक्रवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
भाजप नेतृत्वाने गमांग यांच्या पक्षप्रवेशाला मान्यता दिली असली, तरी त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश नंतर भुवनेश्वरमध्ये होणार आहे. ७२ वर्षांचे आदिवासी नेते गमांग यांनी गेल्या ३० मे रोजी काँग्रेस पक्ष सोडला होता. आपल्याला भाजपचे राजकीय धोरण पसंत पडल्यामुळे त्या पक्षात जाण्याचे आपण ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले.
मी भाजपमध्ये सामील होण्याचे ठरवले आहे, मात्र अधिकृतरीत्या मी लवकरच प्रवेश करणार असून त्याबाबत पक्षाची राज्य शाखा निर्णय घेईल. आज मी अमित शहा यांना भेटून पक्षात घेण्याची केलेली विनंती त्यांनी मान्य केली, असे शहा यांच्याशी तासभर झालेल्या भेटीनंतर गमांग यांनी सांगितले.
तुम्ही भाजपमध्ये का जात आहात असे विचारले असता गमांग म्हणाले की, माझ्यासमोर अनेक पर्याय होते, परंतु जेथे माझा स्वीकार केला जाईल अशा पक्षात जाण्याचे मी ठरवले.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून त्याने स्वत:ला काँग्रेसचा पर्यायी पक्ष म्हणून सिद्ध केले आहे. ज्याप्रकारे ते भारतीय लोकशाहीत आपले धोरण राबवत आहेत, ती नवी संकल्पना आहे. त्यात केवळ सत्तेत राहणे नव्हे, तर लोकांची सेवा करणे अंतर्भूत आहे, असे गमांग यांनी सांगितले.
गमांग हे ओडिशातील अनुभवी राजकारणी असून त्यांना आदिवासी, गरीब आणि मागासवर्गीय समाजात आदर आणि विशेष स्थान आहे. काँग्रेस हा दिवाळखोर पक्ष असून अनेक जण तो सोडून जात आहेत. गमांग यांच्या भाजप प्रवेशाचा पक्षाला फायदा होईल, असे केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान म्हणाले.