X
X

‘एक कानशिलात लगावल्यानंतर मसूद अझहर घडाघडा बोलू लागला’

आम्हाला त्याच्यावर बलप्रयोग करण्याची गरजच पडली नाही. कारण तो स्वत:च सर्व माहिती सांगत होता- निवृत्त अधिकारी

भारतावर झालेल्या काही भीषण हल्ल्यातील आरोपी आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची चौकशी करणे सोपे होते. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या कानशिलात ठेऊन दिल्यानंतर तो हादरला होता. त्यानंतर त्याने घडाघडा आपल्या सर्व हालचाली आणि कटाची माहिती सुरक्षा यंत्रणांना देऊन टाकली होती, अशी माहिती पोलीस दलातील एका माजी अधिकाऱ्याने सांगितली आहे. या अधिकाऱ्याने १९९४ मध्ये मसूद अझहरची चौकशी केली होती. अझहर पोर्तुगालच्या बनावट पासपोर्टवर बांगलादेश मार्गे भारतात घुसला आणि त्यानंतर तो काश्मीरला गेला होता. त्याला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथे फेब्रुवारी १९९४ मध्ये अटक केली होती.

त्या अधिकाऱ्याने सांगितले की, अटकेत असताना मसूद अझहरची चौकशी करताना गुप्तचर यंत्रणांना अडचण आली नाही. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने कानशिलात लगावल्यानतर अझहरने घडाघडा बोलण्यास सुरूवात केली. त्याने पाकिस्तानमधून संचलित दहशतवादी समूहाच्या कामकाजाबाबत विस्तृतपणे माहिती दिली. सिक्किमचे माजी पोलीस महानिरीक्षक अविनाम मोहनाने यांनी ‘पीटीआय’ला ही माहिती दिली. गुप्तचर यंत्रणेत ते दोन दशके कार्यरत होते. अझहरला अटक केल्यानंतर त्यांनी त्याची अनेकवेळा चौकशी केली होती.

इंडियन एअरलाइन्सचे विमान आयईसी- ८१४ तील प्रवाशांचे अपहरण करून त्यांच्या बदल्यात दहशतवाद्यांनी तत्कालीन भाजपा सरकारकडून १९९९ मध्ये अझहरची सुटका करून घेतली. त्यानंतर अझहरने जैश ए मोहम्मदची स्थापना केली आणि भारतात अनेक ठिकाणी हल्ले केले. यामध्ये संसदेवर हल्ला, पठाणकोट येथील वायूसेनेच्या तळावर हल्ला, जम्मू आणि उरी येथील लष्कराच्या कॅम्पवर हल्ले आणि मागील आठवड्यात पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेला हल्ला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.

मोहनाने म्हणाले की, अटकेत असताना अझहरने पाकिस्तानमधील दहशतवादी भरतीची प्रक्रिया आणि दहशतवादी समूहांच्या कामकाजाची माहिती दिली. त्यावेळी भारतातील गुप्तचर यंत्रणा या पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून सुरू करण्यात आलेल्या छुप्या युद्धाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते.

१९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले मोहनाने यांनी काश्मीर डेस्कचे नेतृत्व केले होते. ते म्हणाले, कोट बलवाल कारागृहात त्याची भेट घेण्याची आणि चौकशी करण्याचा प्रसंग अनेकवेळा आला होता. आम्हाला त्याच्यावर बलप्रयोग करण्याची गरजच पडली नाही. कारण तो स्वत:च सर्व माहिती सांगत होता.

त्याने अफगाणी दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात पाठवले जाणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर हरकत उल मुजाहिदीन (एचयूएम) आणि हरकत उल जेहाद ए इस्लामीचे (हुजी) हरकत उल अन्सारमध्ये विलिनीकरणाचीही माहिती दिली. तो हरकत उल अन्सारचा प्रमुख होता. बांगलादेशातून १९९४ मध्ये भारतात आल्यानंतर अझहर काश्मीरला जाण्यापूर्वी सहारनपूरला गेला होता. तिथे त्याने एचयूएम आणि हुजीच्या प्रमुखांशी बैठक घेतली होती.

चौकशीदरम्यान अझहर सविस्तर माहिती सांगत. कराची येथून प्रकाशित होणाऱ्या ‘सदा ए मुजाहिद’ या वृत्तपत्राचा पत्रकार म्हणून त्याने पाकिस्तानच्या काही पत्रकारांसमवेत १९९३ मध्ये काही देशांचा दौरा केला होता. तिथे त्याने काश्मीर हितासाठी समर्थन मागितले होते.

पोलीस आपल्याला जास्त दिवस ताब्यात ठेऊ शकत नाही. आपण पाकिस्तान आणि आयएसआयसाठी अत्यंत महत्वाची व्यक्ती आहोत, हे तो नेहमी सांगत असत. १९९४ मध्ये त्याच्या अटकेच्या १० महिन्यानंतर दिल्लीतून काही विदेशी नागरिकांचे अपहरण करण्यात आले आणि अपहरणकर्त्यांनी अझहरच्या सुटकेची मागणी केली. परंतु, उमर शेखच्या अटकेमुळे ती योजना अपयशी ठरली. त्यानंतर १९९९ मध्ये विमानाचे अपहरण करून अझहरची सुटका करून घेण्यात आली होती.

मोहनाने म्हणाले की, मी १९९७ मध्ये त्याची पुन्हा एकदा भेट घेतली. मी आता नव्या पदावर जात असल्याचे त्याला सांगितल्यानंतर त्याने मला शुभेच्छा दिल्या. नंतर मी नव्या ठिकाणी रूजू झाल्यानंतर ३१ डिसेंबर १९९९ रोजी विमानाचे अपहरण करून प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहरची सुटका केल्याचे वृत्त आले. मला जास्त दिवस तुम्ही अटक करू शकत नाही, हे तो वारंवार बोलत असत. अखेर त्याचे शब्द खरे ठरले.

22
First Published on: February 19, 2019 11:57 am
Just Now!
X