माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्या स्वरुपाची विनंती त्यांनी सरन्यायाधीशांकडे केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने यांनी सुब्रमण्यम यांच्यासंदर्भात नकारात्मक अहवाला दिल्यानंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
सॉलिसिटर जनरल असताना सुब्रमण्यम यांनी टूजी घोटाळ्यातील आरोपी ए. राजा यांच्या वकिलांची स्वतःच्या कार्यालयात भेट घेतली होती, असे सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून करण्यात येणाऱया नियुक्तीला केंद्र सरकारने स्थगिती दिली होती. आता स्वतः सुब्रमण्यम यांनीच न्यायाधीशपदासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे.
सीबीआयच्या नकारात्मक अहवालामुळे सुब्रमण्यम यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याला केंद्र सरकार विरोध केला होता. सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यासाठी न्यायाधीशांच्या मंडळाकडून आलेल्या शिफारशीलाही सरकारने स्थगिती दिली होती, या स्वरुपाचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने याआधीच दिले होते.