करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने प्रार्थनास्थळं अद्यापही लोकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. प्रार्थनास्थळं उघडली जावीत यासाठी विरोधकांकडून अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. यादरम्यान सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग कमी झाला असल्याने प्रार्थनास्थळं लोकांसाठी उघडा असं पत्र यांनी लिहिलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांनी हे पत्र लिहिलं आहे.

यावेळी त्यांनी सरकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करोनाविरोधात दिल्या जात असलेल्या लढ्याचं कौतुक करताना दिल्लीत दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होणं दिलासा देणारं असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवले जात असून रेस्तराँ, बार, चित्रपटगृहांना ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

“सर्व काही पुन्हा एकदा सुरळीत होत असून या सकारात्मक खुणा आहेत,” असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “प्रार्थनास्थळांमध्ये धार्मिक गोष्टींना परवानगी दिल्याने कोणताही अनुकूल परिणाम होणार नाही. लोकांना धार्मिक पूजा आणि सेवांना उपस्थित राहण्याची अनुमती दिल्यास त्यांना तणाव कमी होण्यास मदत होईल आणि यामुळे त्यांना सकारात्मकता, आशा, आत्मशक्ती आणि आत्मविश्वास मिळेल ही वस्तुस्थिती आहे, ही काळाची गरज आहे”.

यावेळी त्यांनी पत्रात लोकांना सार्वजनिक प्रार्थनास्थळांवर परवानगी नाकारणं भेदभाव करणारं आणि घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन करणारं असू शकतं याकडेही लक्ष वेधलं आहे.