हरयाणामधील जींद जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामध्ये सोमवारी सायंकाळी उप जिल्हा शल्यचिकित्सक असणाऱ्या डॉ. रमेश पांचाल यांनी माणुसकीचं दर्शन घडवणारं कृत्य केलं. स्ट्रेचर मिळत नसल्याने रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गाडीमध्ये वेदना सहन करत असणाऱ्या माहिला रुग्णाला थेट उचलून घेत पांचाल यांनी तिला आपत्कालीन विभागात नेलं. आपल्याला करोनाचा संसर्ग होईल किंवा इतर कोणी मदत करेल या साऱ्याचा विचार न करता पांचाळ यांनी थेट या महिलेला उचलून घेतलं मात्र अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या या सोनिया नावाच्या ३८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती आठ महिन्यांची गरोदर होती. मरण पावल्यानंतर तिची करोना चाचणी केली असताना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. त्यामुळेच गरोदरपणामध्ये अॅनिमियामुळे निर्माण झालेल्या कॉप्लिकेशन्समुळे तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

सोनिया ही उत्तर प्रदेशमधील बांदा येथील रहिवासी होती. सोनिया ही तिचा पती रामशाही सोबत खरकरामजी या गावातील वीट भट्टीवर मजूर म्हणून काम करायची. या महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला मात्र त्यांना अपयश आलं. सोनियाची तब्बेत खालावल्याने तिला आम्ही रुग्णालयात घेऊन आल्याचं तिचा पती रामशाही याने सांगितलं. आम्ही रुग्णालयाच्या दाराशी स्ट्रेचर शोधत होतो मात्र काही केल्या ते मिळत नव्हतं. इतक्यात डॉ. पांचाळ आले त्यांनी गाडीमधून सोनियाला दोन्ही हातांमध्ये उचललं आणि ते तिला उपाचारांसाठी घेऊन गेले. मात्र दुर्देवाने तिचा मृत्यू झाला, असं रामशाही म्हणाला.

असं असलं तरी डॉक्टरांनी ज्यापद्धतीने प्रसंगावधान दाखवत या महिलेला थेट उचलून घेत आतप्तकालीन विभागात नेलं त्यावरुन काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी डॉक्टरांचे कौतुक केलं आहे. “जींद येथील सरकारी रुग्णालयामध्ये स्ट्रेचर मिळत नसल्याने चिंताजनक प्रकृती असणाऱ्या माहिलेला थेट दोन हातांमध्ये उचलून घेत येथील उप जिल्हा शल्यचिकित्सक असणाऱ्या डॉ. रमेश पांचाल यांनी थेट आपत्कालीन विभागाकडे धाव घेतली. तुम्हाला सॅल्यूट करतो सर. कोण म्हणतं माणुसकी मेलीय म्हणून?”

या रुग्णालयातील एसएमओ असणाऱ्या डॉ. गोपाय गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनियाच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता होती. काही दिवसांपूर्वीच याचसंदर्भात उपचारांसाठी ती रोहतकमधील सरकारी रुग्णालयात गेली होती. मात्र पूर्ण उपचार न घेताच तिचा पती तिला घेऊन गेला. सोमवारी अचानक तिची प्रकृती खालावली तर तिला रुग्णालयात आणण्यात आलं. येथेच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. स्ट्रेचर मिळत नसल्यासंदर्भाच विचारले असता गोयल यांनी रुग्णालयात ११० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. जेव्हा या महिलेला आणण्यात आलं तेव्हा स्ट्रेचर्स दुसऱ्या वॉर्डमध्ये होते, असं सांगितलं.