वाराणसीतील ग्यानवापी मशिदीच्या समितीने मशिदीबाहेरील १७०० चौरस फूट जागा काशी विश्वानाथ मंदिरास दिली असून मंदिराच्या आजूबाजूची १००० चौरस फूट जागा मशिद समितीला देण्यात आली आहे.  दोन्ही भूखंडांची किंमत सारखीच असल्याचे काशी विश्वानाथ विश्वास्त संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, मंदिराला दिलेली जागा ही वक्फ मंडळाची असून ती विकत घेतली जाऊ शकत नाही पण तिची किंमत मशिदीला दिलेल्या जागेइतकीच आहे.

एप्रिलमध्ये वाराणसी न्यायालयाने पुरातत्त्व खात्याला असा आदेश  दिला होता, की काशी विश्वानाथ मंदिर व ग्यानव्यापी मशीद यांच्यातील वाद निकाली काढण्यात यावा. अनेक दशकांपूर्वीचा हा वाद आहे. न्यायालयाने असाही आदेश दिला होता, की मुघल सम्राटांनी हिंदू मंदिर पाडून तिथे मशीद बांधली. या आरोपावर निर्णय होणे अपेक्षित आहे. १९९१ मध्ये याबाबत दावा दाखल करण्यात आला असून ग्यानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिर उभारण्याची मागणी करण्यात आली होती.

१५ मार्च रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने याबाबतच्या याचिकांवर निकाल राखून ठेवला असून त्यात १९९१ च्या दाव्याला वाराणसी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यातही ग्यानवापी मशिदीच्या जागेवर असलेल्या प्राचीन मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी करण्यात आली होती.