ब्रिटनमध्ये भाषेबाबत शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी
सध्या समाजमाध्यमातील संवाद भाषेचा लिखित भाषेवर परिणाम होत चालला आहे. अनेक शब्दांचे लघुरूप तर वापरले जाते आहेच, शिवाय कुठल्याही ठिकाणी उद्गारचिन्ह वापरण्याची सवयच तरूणांना लागली आहे. समाज माध्यमांचा हा भाषिक परिणाम टाळण्यासाठी ब्रिटनने उद्गारचिन्हे कुठे घालावीत याची मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. ब्रिटनमध्ये मुलांच्या अभ्यासाच्या वह्य़ा किंवा उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकांना विशेष बाबींकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
जर एखाद्या वाक्याच्या सुरूवातील हाऊ किंवा व्हॉट असे शब्द असतील तरच त्यांच्या शेवटी उद्गारचिन्हे वापरावीत असे नियमावलीत म्हटले आहे. ‘व्हॉट अ लव्हली डे’ यात शेवटी उद्गारवाचक चिन्ह ठीक आहे किंवा हाऊ एक्सायटिंग यातही ठीक आहे, असे मार्गदर्शक पुस्तिकेत म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे व्याकरण, स्पेलिंग, विरामचिन्हे यांच्याकडे आता शिक्षकांना लक्ष द्यावे लागेल. उद्गारचिन्हाने संपणारे वाक्य असेल तर त्यात नियम पाळले गेले पाहिजेत असा आग्रह आहे. शिक्षकांचे म्हणणे असे, की आता विद्यार्थी कुठेही उद्गारचिन्हे वापरतात. विशेष करून टेक्स्ट संदेशांमुळे त्यांना ही सवय लागली आहे. यामुळे सात वर्षे वयाची मुले सर्जनशील लिखाण करू शकणार नाहीत अशी भीती शिक्षकांना वाटते. मुले जी पुस्तके वाचतात त्यातही उद्गारचिन्हांचा भडिमार आहे. ‘हाऊ गुड इज युवर ग्रामर’ या पुस्तकाचे लेखक जॉन सदरलँड यांनी सांगितले की, इंग्रजी लेखनासाठी असे नियम घालणे ही थट्टेची बाब आहे. हे नियम पाळणे शक्य नाही.
उद्गारचिन्हे ही सूचक असतात व ती संदर्भात्मक स्थितीत वापरतात, त्यात संभाषण असते. ‘इंग्रजी भाषेची संज्ञापन क्षमता वाढवणे हे उच्च दर्जाच्या शिक्षणात महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही काही नियम घालून दिले आहेत,’ असे ब्रिटनच्या शिक्षण खात्याने म्हटले आहे.