चंदीगडमधील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीचा पाठलाग केल्याची कबुली भाजप नेता आणि हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलानं दिली असतानाच या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ४ ऑगस्टच्या रात्री तरुणीचा पाठलाग करण्यापूर्वी विकासचा मित्र आशिष कुमार यानं वाईन शॉपमधून दारू विकत घेतली होती, अशी माहिती समोर आली आहे. वाईन शॉपमधील सीसीटीव्ही फुटेज ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या हाती लागले आहेत. त्यात आशिष वाईन शॉपमधून दारुची बाटली घेऊन जाताना दिसत आहे.

चंदीगडमधील आयएएस अधिकारी व्ही. एस. कुंडू यांची मुलगी वर्णिका कुंडू हिचा पाठलाग आणि अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे हरयाणा प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास आणि त्याचा मित्र आशिष कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर विकास पोलीस ठाण्यात हजर झाला होता. तीन तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

४ ऑगस्ट रोजी रात्री विकास आणि त्याचा मित्र आशिष कुमार यानं वर्णिकाचा पाठलाग केला होता. तिनं नियंत्रण कक्षाला फोन करून या घटनेची माहिती दिली होती. सुभाष बराला यांचा मुलगा विकास यानं आपला पाठलाग केल्याचा आरोप वर्णिकानं केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या अटकेसाठी दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटकाही झाली होती. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी बुधवारी विकास बरालाला समन्स बजावले होते. बुधवारी विकास पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याची तीन तासांहून अधिक वेळ चौकशीही केली. त्यानंतर त्याला अटक केली.