बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्यातील संघर्ष आणखी टोकाला गेला आहे. मांझी यांनी मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर अजून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडलेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या आंबा व लिचीच्या झाडाला लगडलेल्या फळांच्या संरक्षणासाठी सुरक्षा तैनात केल्याने वाद वाढला आहे.
मुख्यमंत्र्यांसाठीचा प्रशस्त बंगल्यातच मांझी यांचे वास्तव्य आहे. तिथल्या झाडांच्या फळांच्या संरक्षणासाठी २४ पोलीस तैनात केल्याचा दावा मांझी यांच्या हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रवक्ते दनिश रिझवान यांनी केला आहे. जमिनीवर पडलेले फळही उचलण्यास परवानगी नाही, असा दावा रिझवान यांनी केला आहे. मांझी यांनी मुख्यमंत्रिपद गेल्यावरही अधिकृत निवासस्थान सोडण्यास नकार दिला आहे. लालूप्रसाद यांनीही पद गेल्यानंतर चार ते पाच महिने मुख्यमंत्री निवासस्थान सोडले नव्हते. मग आपण का सोडावे, असा मांझी यांचा सवाल आहे.
नितीशकुमार यांनी मात्र मांझी यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. असे निर्देश मी दिलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असल्याने सुरक्षा असते. जर असे काही असेल तर त्यांना तेथील फळे घेण्यास हरकत नाही, असे नितीशकुमार यांनी सांगितले.
भाजपला या मुद्दय़ावर टीकेची संधी मिळाली आहे. नितीशकुमार यांना आम आदमीपेक्षा झाडावरील आम(आंबे) गमावण्याची चिंता सतावते आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी केली. बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आले असून, लोकांच्या सुरक्षेपेक्षा मांझी यांच्या निवासस्थानी आंबे व लिचीच्या सुरक्षेसाठी सरकार पोलीस पुरवते, अशी टीका त्यांनी केली.