तामिळनाडू, केरळ, आसाममध्ये सत्तांतर शक्य; मतदानोत्तर चाचण्यांचा कौल

चार राज्ये व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील मतदान सोमवारी संपताच मतदारांचा कौल कुणाला मिळणार याची सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे. प्रत्यक्ष मतमोजणी गुरुवारी होणार असली तरी विविध वाहिन्यांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये आसाम, केरळ व तामिळनाडू या राज्यांमध्ये सत्तांतराचे भाकीत करण्यात आले असून, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस बाजी मारेल अशी शक्यता वर्तवली आहे. पुदुच्चेरीतही एनआर काँग्रेसची सत्ता द्रमुक हिसकावून घेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात केरळमध्ये ७१ टक्के, तामिळनाडूत ६९.१९ टक्के, तर पुदुच्चेरीत ८१.९४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान बहुतांश शांततेत पार पडले.

आसाममध्ये सत्तांतर होऊन ईशान्य भारतातील या मोठय़ा राज्यात भाजपची सत्ता येईल असा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये यापूर्वीचा अंदाज चुकीचा ठरवत चाचणीत द्रमुक-काँग्रेस आघाडीची सत्ता येण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ सरकार पायउतार होऊन डाव्या आघाडीचे एलडीएफ सरकार बाजी मारेल असे चाचण्यांचे भाकीत आहे.

पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीपासून ममता बॅनर्जी याच विजयी होतील असे भाकीत होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर एका स्टिंग ऑपरेशनमध्ये तृणमूलचे नेते कामांसाठी पैसे घेत असल्याचे दाखवण्यात आल्याने पक्षाची कोंडी झाली होती. तरीरी ममतांनी नेटाने एकहाती प्रचार केला. विशेष म्हणजे त्यांना तोंड देण्यासाठी एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले तरीही ममतांची सत्ता त्यांना घालवण्यात यश येत नसल्याचे मतदानोत्तर चाचण्या सांगतात. एबीपी व सी-व्होटर यांच्या चाचण्यांमध्ये तृणमूल काँग्रेसला १६० हून अधिक जागा दिल्या आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागा आहेत. केरळमध्ये आलटून-पालटून सत्तांतराची परंपरा यंदाचा कायम राहण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने वर्तवलेल्या अंदाजात १४० पैकी ९४ जागा डाव्या आघाडीला मिळतील असे म्हटले आहे. आसाममध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता जाण्याची चिन्हे आहेत. बिहारमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपने काँग्रेसचे १५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या तरुण गोगोई यांच्यापुढे केंद्रीय क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे नाव पुढे केले. तसेच बोडो पीपल्स फ्रंट व आसाम गण परिषद यांच्याशी युती करत काँग्रेसविरोधी मतांची विभागणी टाळली. त्याचा फायदा भाजपला मिळताना दिसत आहे. बहुमतासाठीचा ६४ चा आकडा भाजप पार करेल असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूत सत्तारूढ अण्णाद्रमुक आणि प्रमुख विरोधी पक्ष द्रमुक यांच्यात होणाऱ्या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याचा अंदाज कुणालाही येत नव्हता.

मतदानोत्तर चाचण्या
chart
chart1