तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना केले आहे. दरम्यान, या रणनितीचा उपयोग ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी केला जातो, असा आरोपही त्यांनी केला आहे.

रविवारी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. यामध्ये एनडीए बहुमताकडे जात असल्याचे दिसून आले होते. एक्झिट पोलच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनंतर ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी ही रणनिती वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकत्र, खंबीर आणि साहसी राहण्याचे आवाहन करत आहे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

सर्व एक्झिट पोलच्या सरासरीनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अंदाजे 12 ते 15 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर तृणमूल काँग्रेसला 23 ते 26 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांना खातेही उघडता येणार नाही, असा अंदाज असून काँग्रेसला एका जागेवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2014 मधील लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी तब्बल 34 जागांवर विजय मिळवला होता. तर डाव्या पक्षांनी दोन, भाजपाने दोन आणि काँग्रेसला चार जागांवर विजय मिळवला होता. 2009 मधील लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचे 17 खासदार होते. 2014 मध्ये पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या खासदारांची संख्या 2 वर आली होती. त्यामुळे 2019 मधील निवडणूक डाव्या पक्षांसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे. तर पश्चिम बंगालमध्ये दोन आकडी संख्या गाठून तृणमूल काँग्रेससमोर आव्हान निर्माण करण्याचे मनसुबे भाजपाने रचले होते.