उत्तर कोरिया युरेनियम शुध्दीकरण प्रकल्पाचे विस्तारीकरण करीत असून योंग बायोन येथील अणु संकुलात मोठ्या घडामोडी चालू आहेत. अणुबॉम्बसाठी लागणारे साहित्य तेथे तयार केले जात असल्याचे काही छायाचित्रातून दिसून आले आहे, असे  तज्ज्ञांनी म्हटले आहे.

उत्तर कोरियाने सहा महिन्यानंतर प्रथमच तीन क्षेपणास्त्र चाचण्या केल्या असून त्यामुळे या भागात तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावा यासाठी अमेरिकेच्या वाटाघाटी सुरू असून त्यात यश आलेले नाही. युरेनियम शुद्धीकरण प्रकल्पाचे विस्तारीकरण चालू असल्याचे दिसून आले असून योंगबायोन येथील संकुलात अण्वस्त्रांसाठी लागणाऱ्या युरेनियमचे शुद्धीकरण केले जाते. सध्या या प्रकल्पाची क्षमता २५ टक्के  वाढणार असल्याचे माँटेरी येथील मिडरलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या संस्थेचे जेफ्री लुईस व इतर दोन  जणांनी म्हटले आहे.

मक्सारने घेतलेल्या छायाचित्रानुसार युरेनियम प्रकल्पाचे विस्तारीकरण चालू असल्याचे दिसत आहे. उपग्रह छायाचित्रे १ सप्टेंबरला घेतली असून उत्तर कोरियाने या भागात प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी काही झाडे पाडली आहेत. माती खणण्यासाठीची यंत्रेही वापरली जात आहेत.  १४ सप्टेंबरच्या छायाचित्रात हा भाग बंदिस्त करण्यासाठी भिंती बांधल्याचे दिसत आहे. नवीन भाग हा १ हजार चौरस मीटरचा असून तेथे अतिरिक्त १ हजार सेंट्रीफ्युजेस बसवले आहेत. त्यामुळे युरेनियम शुध्दीकरणाची क्षमता २५ टक्के इतकी वाढणार आहे.

शुद्ध युरेनियमच्या  किंवा प्लुटोनियमच्या मदतीने अणुबॉम्ब तयार करता येतो. गेल्या महिन्यातील उपग्रह छायाचित्रानुसार उत्तर कोरिया अण्वस्त्र दर्जाच्या प्लुटोनियमची निर्मिती सुरू करीत आहे. निर्बंध उठवले तर अण्वस्त्र निर्मिती थांबवू असे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन  यांनी २०१९ मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शिखर बैठकीवेळी सांगितले होते. पण अमेरिकेने किम यांचा प्रस्ताव फेटाळल्याने अण्वस्त्र निर्मितीची प्रक्रिया थांबवण्यात यश आले नव्हते.