लोकसभेच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले, तरी या वर्षी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होण्याची अपेक्षा असल्याचे मत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केले आहे.
राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होतील आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्या राजवटीत काँग्रेसचा जो लौकिक होता त्याच धर्तीवर पक्षाला नव्या प्रादेशिक नेतृत्वाच्या आधारावर गतवैभव प्राप्त करून देतील, असेही रमेश म्हणाले.
राहुल गांधी २०१५ मध्येच काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची अपेक्षा आहे आणि ते याच वर्षी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारतील. विविध राज्यांमध्ये नवे नेतृत्व निर्माण करण्यास राहुल गांधी बांधील आहेत, असेही रमेश म्हणाले. काँग्रेसला राज्य पातळीवरील नेतृत्वाची गरज असल्याची जाणीव राहुल गांधी यांना आहे, असेही ते म्हणाले.
नामनिर्देशनाच्या संस्कृतीवर राहुल गांधी यांचा विश्वास नाही, जनतेतूनच नेतृत्व निर्माण होण्यावर त्यांचा विश्वास आहे, असे रमेश म्हणाले.