नरेंद्र मोदींना पक्षात वरचे स्थान देण्याबाबत अद्याप स्पष्ट संकेत दिले गेले नसले तरी कार्यकर्त्यांच्या अपेक्षांकडे पक्ष दुर्लक्ष करू शकत नाही, असे भाजपने रविवारी स्पष्ट केले.
मोदी यांची प्रचारप्रमुखपदी निवड करीत भाजपने एनडीएतील घटक पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलालाही संदेश दिला आहे. मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे चित्र उभे केले जात असून संयुक्त जनता दलाचा त्याला विरोध आहे. त्यावर भाजपने स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्ष आहे किंवा नाही, यासाठी पक्षाला दुसऱ्या कुणाच्याही प्रशस्तिपत्राची गरज नाही.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पक्षातील इतर नेत्यांप्रमाणे धर्मनिरपेक्ष आहेत. तसेच एनडीएतील सर्व घटक पक्षांनाही सोबत घेऊनच पुढील वाटचाल करणार असल्याचे  भाजपचे प्रवक्ते सईद शहानवाझ हुसेन यांनी स्पष्ट केले.
मोदी भाजपचा हुकमी एक्का
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी हे पक्षासाठी हुकमी एक्का असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे. तसेच मोदींच्या नावाला लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध असल्याच्या वृत्ताचेही त्यांनी खंडन केले.
केवळ पक्ष कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर नेत्यांमध्येही सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या व्यक्तीकडे एकमताने विशेष जबाबदारी दिल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे जेटली म्हणाले.
शिवसेनेकडून स्वागत
भाजपाच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची नियुक्ती झाल्यानंतर भाजपाचा जुना सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने मोदींच्या नियुक्तीचे स्वागत केले. मोदी यांच्यामुळे केंद्रात काँग्रेस सरकारला धक्का देऊन रालोआचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा विश्वास सेनेने व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेशात असल्यान त्यांनी तेथून् मोदी यांना दूरध्वनी करून अभिनंदन केले, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
गुजरात-बिहारमध्ये जल्लोष
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराची धुरा नरेंद्र मोदी यांच्याकडे देण्याचा निर्णय पक्षाने जाहीर केल्यानंतर गुजरातमध्ये जल्लोशाचे वातावरण पसरले. मोदींची निवड झाल्याचे जाहीर होताच मुख्यमंत्री मोदी यांच्या समर्थकांनी जागोजागी फटाक्यांची आतषबाजी करीत मोदींचा जयघोष केला. बिहारमधील भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी पक्ष कार्यालयासमोर फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
..ही तर सर्वोत्तम खेळी – बादल
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदी यांची भाजपने केलेली निवड ही सर्वोत्तम खेळी असल्याचे शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांनी म्हटले. मोदींची निवड ही यूपीए सरकारला जोरदार धक्का देणारी खेळी असल्याचेही ते म्हणाले.
यशवंत सिन्हांची सावध प्रतिक्रिया
नरेंद्र मोदी यांच्या निवडीनंतर ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी ठळकपणे त्यांचे स्वागत केले नाही वा अडवाणींच्या सोबत असल्याचेही स्पष्ट केले नाही. पक्षात सर्वात आधी मोदींबाबत सकारात्मक बोलणाऱ्यांपैकी आपण एक होतो. पक्ष कार्यकर्ते तसेच लोकांना मोदी हवे असल्यामुळे आपण त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती, असे मोदींच्या निवडीनंतर सिन्हा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अडवाणींच्या घरासमोर निदर्शने करण्याच्या घटनेबद्दल सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली. अडवाणी हे केवळ ज्येष्ठ नेतेच नाहीत तर पक्षातील सर्वात सन्माननीय सदस्य असल्याचे सांगत गेल्या काही दिवसांपासून आपण मोदीविरोधी आणि अडवाणी समर्थक असल्याचे चित्र रंगवले जात असून ते चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संसद सत्रानंतर आपण अडवाणींना भेटलोही नाही वा त्यांच्याशी बोललोही नसल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
नव्या पिढीकडे धुरा सोपवण्यासाठी हीच योग्य वेळ- पर्रिकर
वयाच्या ६५ वर्षांनंतर राजकारण्यांनी निवृत्त व्हावे असे विधान करून मागे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घूमजाव करीत पक्षात वयाचा प्रश्न नसल्याचे म्हटले. मात्र आता पक्षाची धुरा नव्या पिढीकडे सोपवण्याची हीच वेळ असल्याचे म्हणत नरेंद्र मोदींच्या प्रचारप्रमुख पदासाठी झालेल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले.
मोदी यांची झालेली निवड हा देशासाठी महत्त्वाचा दिवस आहे. काँग्रेस अकार्यक्षम झाली असून आता मोदींच्या निवडीमुळे एक बदल घडून येईल, असा विश्वास पर्रिकर यांनी व्यक्त केला.
मोदी हे सर्व वादांचे नेते- काँग्रेस
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होऊच शकत नाही. राहुल गांधी हे वादांपासून दूर असलेले नेते आहेत. तर नरेंद्र मोदी हे सर्व वादंग ओधवून घेणारे नेते असल्याची टीका दिल्ली काँग्रेसने केली आहे.
दिल्ली काँग्रेसचे नेते आणि शहर विकासमंत्री अरविंदर सिंग लव्हली यांनी मोदी यांच्या निवडीबद्दल टीका करताना म्हटले की, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि यशवंत सिन्हांसारख्या ज्येष्ठांच्या अनुपस्थितीत अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी मोदींची प्रचारप्रमुख म्हणून निवड केली, यावरून त्यांच्या नावाला किती विरोध होता आणि नाराजी होती हेच दिसते.

मोदींची निवड देशहिताचीच
– शिवराज सिंग चौहान
नरेंद्र मोदी यांना येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे प्रमुख म्हणून नेमण्याचा निर्णय केवळ पक्षालाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी फायदेशीर ठरेल, असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी व्यक्त केले. मोदी आणि पक्षातील इतर नेत्यांना लालकृष्ण अडवाणी यांचा आशीर्वाद कायम असल्याचेही चौहान पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मोदींची निवड ही पक्षांतर्गत बाब – संयुक्त जनता दल
संयुक्त जनता दलाने मोदींची प्रचार प्रमुखपदी झालेली निवड ही भाजपची पक्षांतर्गत बाब असल्याचे म्हटले आहे. मात्र पंतप्रधानपदाचा उमेदवार हे एनडीएतील घटक पक्ष ठरवतील, असे स्पष्ट करीत मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मोदी हे एनडीएचे प्रचारप्रमुख नाहीत. भाजपने कुणाला पक्षाचा अध्यक्ष करावे वा प्रचार प्रमुख करावे ही त्यांची अंतर्गत बाब असल्याचे मत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी व्यक्त केले. एनडीए गेली सतरा वर्षे राष्ट्रीय मुद्दय़ांवर एकत्रित काम करीत आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार हादेखील राष्ट्रीय मुद्दय़ांना विचारात घेऊनच करण्यात येणार असल्याचे यादव म्हणाले.