चीनपेक्षा भारतानेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जास्त वेळा ओलांडली, असे वक्तव्य करून चीनच्या हाती आयते कोलीत देणारे केंद्रीय रस्ते व वाहतूक राज्यमंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टीकरण करावे. तसेच त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी लोकसभेत केली.

लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, व्ही. के. सिंह यांनी जे बेदरकार वक्तव्य केले आहे, त्यामुळे चीनच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. त्यांचे विधान वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असून त्यात त्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याबाबत हा मुद्दा मांडला.

चौधरी यांनी सांगितले की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सध्याच्या परिस्थितीवर निवेदन करावे तसेच व्ही. के. सिंह यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्यावर प्रकाश टाकून त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची कारवाई करावी.

प्रकरण काय?

* सिंह यांनी रविवारी मदुराई येथे बोलताना, असे सांगितले होते, की भारत व चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा स्पष्टपणे आखलेली नाही. भारत व चीन यांनी त्यांच्या आकलनानुसार रेषा मानली आहे. त्यामुळे अनेकदा या रेषेचे उल्लंघन झाले आहे. जर चीनने दहा वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली असेल, तर भारताने पन्नास वेळा ओलांडली आहे.

* व्ही. के. सिंह यांच्या या विधानाचा फायदा घेत चीनने आक्रमक भूमिका घेत भारताला कोंडीत पकडले आहे, असे सांगून काँग्रेसने म्हटले आहे की, व्ही. के. सिंह यांना या विधानाबाबत मंत्रिमंडळातून काढून टाकावे. भाजपचे मंत्री चीनची भारताविरोधातील बाजू भक्कम करीत आहेत. व्ही. के. सिंह यांना मंत्रिमंडळातून काढले नाही तर तो भारतीय जवानांचा अपमान ठरणार आहे.