उत्तर प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष दयाशंकर सिंह पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. दयाशंकर सिंह यांनी पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर निशाणा साधत त्यांची कुत्र्याशी तुलना केली आहे.
रविवारी माध्यमांशी बोलताना मायावती या अत्यंत धोकेबाज आणि डरपोक महिला आहेत. त्या एखाद्या कुत्र्याप्रमाणे आहेत. जेव्हा तुम्ही एका गल्लीतून दुचाकीवरून जात असता, तेव्हा अचानक एक कुत्रं तुमच्या मागे लागते. तुम्ही गाडी थांबवली तर ते कुत्रं मागे पळून जाते. तसं मायावतींचे असल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी त्यांनी मायावती यांचे भाऊ बसपचे राष्ट्रीय महासचिव सतीशचंद्र मिश्र यांच्यावरही गंभीर आरोप केले. परंतु नंतर आपल्या वक्तव्यापासून फिरून उलट मायावती आणि त्यांचे सहकारीच मला कुत्रा म्हणतात, असे म्हटले.
यापूर्वीही त्यांनी मायावती यांना वेश्या म्हणून वाद ओढावून घेतला होता. मायावती यांनी राज्यसभेतही हा मुद्दा उठवला होता. या टीकेमुळे त्यांच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. यामुळे पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. दयाशंकर सिंह यांना बिहारमधून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने नंतर त्यांना जामीन दिला होता. तर दुसरीकडे बसपचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या घरासमोर येऊन आंदोलन करून आपल्या मुलीविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप दयाशंकर यांच्या पत्नीने केला होता. याप्रकरणी त्यांनी मायावती व इतर कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2016 3:08 pm