04 March 2021

News Flash

सरकारी अधिकाऱ्यांकडून मलाही आला कनिमोळींसारखा अनुभव – पी. चिदंबरम

हिंदी भाषेवरुन निर्माण झालेल्या या वादामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे

पी. चिदंबरम

सीआयएसएफच्या एका महिला अधिकाऱ्यानं हिंदी येत नसल्यानं माझ्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, असा दावा नुकताच द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी केला होता. यावर माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यालाही सरकारी अधिकाऱ्याकडून अशाच प्रकारच्या शेरेबाजीला सामोर जावं लागलं होतं, असं त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

ट्विटरवर चिदंबरम म्हणाले, “द्रमुकच्या नेत्यांबाबत जे घडलंय हे नेहमीच घडत आलं आहे. मी सुद्धा अशा शेरेबाजीला बळी पडलो आहे. फोनवरील संवादादरम्यान आणि काहीवेळा प्रत्यक्ष समोरासमोर संभाषण करीत असताना सरकारी अधिकारी आणि काही सामान्य लोकांकडून मला हिंदीत बोलण्याचा आग्रह करण्यात आला होता. जर केंद्राला खरचं हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा भारताच्या अधिकृत भाषा म्हणून ठेवायच्या असतील तर त्यांनी सर्व केंद्रीय संस्था आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना दोन्ही भाषांमध्ये संवाद साधण्याच्या सूचना द्यायला हव्यात. केंद्र सरकारच्या पदांवर कार्यरत असलेले आणि हिंदी येत नसलेले कर्मचारी लवकर हिंदी बोलायला शिकतात. मग ज्यांना हिंदी येतं ते लवकर इंग्रजी बोलायला का शिकत नाहीत? असा सवालही त्यांनी केला आहे.”

आणखी वाचा- कनिमोळी यांनी हिंदीत उत्तर न दिल्यानं सुरक्षा अधिकाऱ्यानं नागरिकत्वावरच केला सवाल; म्हणाला…

खासदार कनिमोळी यांनी रविवारी ट्विटरवरुन चेन्नई विमानतळावर ओढवलेल्या प्रसंगाबाबत माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “आज विमानतळावर एका सीआयएसएफ अधिकाऱ्याला मी तामिळ किंवा इंग्रजीतून बोलण्यास सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं मला विचारलं की, मी भारतीय आहे का? कारण मला हिंदी येत नाही. मला जाणून घ्यायचं की हिंदी येणं हे भारतीयत्वाच्या समान आहे का?,”

कनिमोळी यांनी ट्विट केल्यानंतर ही घटना प्रसारमाध्यमातून चर्चेत आली. त्यानंतर सीआयएसएफनं या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. “कोणत्याही विशिष्ट भाषेचा आग्रह धरणं हे सीआयएसएफचं धोरण नाही,” असं सीआयएसएफनं ट्विट करून म्हटलं आहे. सीआयएसएफकडून घेण्यात आलेल्या चौकशीच्या निर्णयाबद्दल कनिमोळी यांनी आभार मानले आहेत.

फक्त आपण एका विशिष्ट धर्माचे नसल्यामुळे वा एखादी भाषा बोलता येत नसल्यानं आपलं भारतीयत्व कमी होत नाही. देशाचं मोठेपण त्याच्या विविधतेत आणि सर्वसमावेशकतेचा स्वीकार यामध्ये आहे. आपण ते कुठेतरी गमावत आहोत, असं मला वाटतं,” अशी प्रतिक्रिया कनिमोळी या घटनेवर बोलताना व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 4:05 pm

Web Title: experienced similar taunts from govt officers p chidambaram on kanimozhis cisf incident aau 85
Next Stories
1 रात्रीच्या अंधारात डोंगर रांगांमध्ये ‘राफेल’ची गर्जना, ‘मिशन लडाख’ची तयारी सुरु
2 सचिन पायलट यांनी काँग्रेस नेतृत्वाशी साधला संपर्क, भेटीसाठी मागितली वेळ
3 इस्रायली हेरॉन ड्रोन्ससाठी ‘प्रोजेक्ट चीता’, काय आहे हा प्लान?
Just Now!
X