पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून अद्यापही दहशतवादी कारवाया सुरु असल्याचं दिसत आहे. नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. नियंत्रण रेषेवर तपासणी सुरु असताना हा स्फोट झाला असल्याचं कळत आहे. दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवर आयईडी ठेवला होता. आयईडी नियंत्रण रेषेपासून 1.5 किमी अंतरावर पेरण्यात आलं होतं. तो निकामी करत असताना स्फोट होऊन मेजर पदावरील अधिकारी शहीद झाला. मेजर चित्रेश सिंग बिश्त असे त्यांचे नाव आहे.

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सगळीकडे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यात धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० किमी वर आहे.