पुलवामामध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्ष झाली आहेत. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी आज(रविवार) पुन्हा दहशतवाद्यांकडून घातपाताचा कट रचण्यात आला होता. मात्र जवानांच्या सतर्कतेने हा कट उधळला गेला.

दहशतवाद्यांनी जम्मू बसस्टॅण्डजवळ मोठयाप्रमाणावर दडवून ठेवलेली ७ किलो स्फोटकं जवानांनी हस्तगत केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी पुन्हा मोठा हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.

या पार्श्वभूमीवर आज(रविवार) सायंकाळी साडेचार वाजता जम्मू विभागाचे आयजीपी मुकेश सिंह माध्यमांना माहिती देणार आहेत. यावेळी ते मागील काही दिवसांमध्ये अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची देखील माहिती देणार आहेत.

पुलवामामधील शहिदांना मोदींनी अर्पण केली श्रद्धांजली, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. ”कोणताही भारतीय हा दिवस विसरू शकत नाही. दोन वर्ष अगोदर आजच्याच दिवशी पुलवामा हल्ला झाला होता. आम्ही त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो, जे या हल्ल्यात शहीद झाले होते. आम्हाला आपल्या जवानांचा अभिमान आहे, त्यांच्या शौर्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.” असं ते चैन्नई येथील एका कार्यक्रमात म्हणाले.