भारतात सध्या जेवढ्या प्रमाणात लशीचा वापर विविध घटकातील लोकांच्या लसीकरणासाठी करण्यात आला आहे त्यापेक्षा जास्त लस मात्रांची निर्यात भारताने इतर देशांना केली आहे. देशात ३.४८ कोटी मात्रा वापरण्यात आल्या तर ५.८४ कोटी लस मात्रांची निर्यात सत्तर देशांना करण्यात आली आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत मंगळवारी एका प्रश्नावरील लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार ५८३.८५ लाख मात्रांची निर्यात करण्यात आली आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. १५ मार्च रोजी एकाच दिवशी ३० लाख लोकांचे भारतात लसीकरण करण्यात आले होते.

अनेक आरोग्य तज्ज्ञ व डॉक्टर्स तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र व बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार शॉ यांनी केंद्राला लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना केली होती कारण महाराष्ट्रासह काही राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. वेल्लोर येथील ख्रिश्चान मेडिकल कॉलेजच्या डॉ. गगनदीप कांग यांनी म्हटले होते, की भारतात वेगाने लसीकरणाची गरज असून  लस वायाही जाता कामा नये. अग्रक्रमाच्या व्यक्तींचे लसीकरण करताना लशीच्या कुपीतील काही मात्रा ही अतिरिक्त राहू शकते, ती अग्रक्रम नसलेल्या व्यक्तींसाठी वापरण्याची गरज आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना अग्रक्रमात नसलेल्या व्यक्तींनाही लशी देण्याची गरज आहे. आरोग्य अर्थतज्ज्ञ रिजो एम जॉन यांनी सांगितले, की दिवसाला ३८ लाख लोकांचे लसीकरण केले तर आपण ऑगस्टपर्यंत ६० कोटी लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करू शकू. जर लशीचा पुरवठा पुरेसा असेल तरच राज्ये लसीकरणाचा वेग वाढवू शकतात.बहुतेक राज्यात आठवड्यातून चार दिवस लसीकरण होत आहे.

आरोग्य राज्यमंत्री चौबे यांनी सांगितले, की देशात लशीचा भरपूर साठा असून येथील लोकांची गरज भागवून इतर देशांना लस निर्यात केली जात आहे.