परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भाजपा आता गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु एआयडीएमके सोबत चर्चा फिस्कटल्यानंतर त्यांना गुजरातमधून लोकसभेवर पाठवण्यावर सध्या विचार सुरू असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी स्मृती इराणी आणि अमित शाह यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. परंतु लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर आता भाजपाच्या कोट्यातील त्या दोन जागा रिक्त होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर एआयडीएमकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. तामिळनाडूतील केवळ एकाच जागेवर या पक्षाला विजय मिळवता आला होता. दरम्यान, एआयडीएमकेच्या कोट्यातील राज्यसभेच्या चार जागाही 24 जुलै रोजी रिक्त होणार आहेत. परंतु निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेनुसार त्यांना त्यापैकी एक जागा पीएमकेसाठी सोडावी लागणार आहे. त्यातच विधानसभेच्या 22 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना 13 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता डीएमकेचेही एआयडीएमकेसमोर आव्हान असणार आहे.

यापूर्वी भाजपाने जयशंकर यांना तामिळनाडूतूनच राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गुजरातमधून भाजपाच्या कोट्यातील दोन जागा रिक्त होणार असल्याने जयशंकर यांना तेथून राज्यसभेची संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. भाजपाने एआयडीएमकेकडे राज्यसभेच्या एका जागेची मागणी केली होती. परंतु त्यांच्या या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. तसेच एआयडीएमके वेल्लोर लोकसभेच्या आणि नानगुनेरी विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक होत नाही तोपर्यंत भाजपाला राज्यसभेची जागा देऊ इच्छित नसल्याचे एका नेत्याने सांगितले. 24 जुलै रोजी तामिळनाडूतून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. तर एप्रिल महिन्यात आणखी सहा जागा रिक्त होणार आहेत.