अमेरिकेतील उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांच्यावरील आरोप मागे घेणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केल्यानंतर परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. खोब्रागडे यांच्यावरील सर्व आरोप अमेरिकेने मागे घेतलेच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी खुर्शीद यांनी गुरुवारी केली होती. मात्र, शुक्रवारी त्यांनी या विषयावर सर्वसमावेशक विचार करायला हवा, असे वक्तव्य केले.
परस्परांशी संबंध राखताना दोन्ही देशांनी सर्वसमावेशकपणे विचार करायला हवा. खोब्रागडे यांच्याप्रकरणी तोडगा निश्चितच काढला जाईल. मात्र, त्यामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडायला नको, याकडेही लक्ष द्यायला हवे, असे खुर्शीद यांनी स्पष्ट केले.
खोब्रागडे अटकप्रकरणी माफी मागणार नाही तसेच त्यांच्यावरील आरोपही मागे घेणार नाही, असे अमेरिकेने गुरुवारी स्पष्ट केले. त्या पार्श्वभूमीवर खुर्शीद यांनी ही प्रतिक्रिया दिली.