सर्वसामान्यांबाबत नेहमीच सहानुभूती दाखवणाऱ्या आणि मदतीला धावून जाणाऱ्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा माणुसकीचे दर्शन घडवले आहे. स्वराज यांनी पाकिस्तानातील एका सात वर्षीय मुलीला ओपन हार्ट सर्जरीसाठी भारतात येण्याची परवानगी दिली आहे. कराचीतून भारतात येण्यासाठी मेडिकल व्हिसा देण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला दिल्या आहेत.

मुलीच्या आईने ट्विटरद्वारे सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. माझ्या सात वर्षांच्या मुलीची ओपन हार्ट सर्जरी करणे गरजेचे आहे. भारतात उपचार करण्यासाठी आम्ही ऑगस्टमध्येच व्हिसासाठी अर्ज केला आहे. अद्याप ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तुम्ही मदत करावी, असे आम्हाला वाटते, असे तिच्या आईने ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावर सुषमा स्वराज यांनीही उत्तर दिले. तुमच्या सात वर्षांच्या मुलीसाठी मेडिकल व्हिसा उपलब्ध करून देण्याची परवानगी देत आहोत. तसेच तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.