भारत आणि बांगलादेशदरम्यान द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या सल्लागार समितीच्या दोन दिवसीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ढाका दौऱ्यावर गेल्या आहेत. यावेळी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एएच अहमद अली यांनी स्वराज यांचे बांगाबंधू विमानतळावर स्वागत केले.

यावेळी दोघांमध्ये तिस्ता नदी आणि रोहिंग्या प्रकरणावर चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दौऱ्यामध्ये स्वराज या बांगलादेशमधील विचारवंत, प्रतिनिधींशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. याचबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचीही भेट घेतल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बांगलादेशमधील खुलना शहरामध्ये बहुद्देशीय सुविधा केंद्र सुरू करण्याबाबत द्विपक्षीय करार आणि हाय-स्पीड डिझेल पुरवठय़ाबाबतच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. यानंतर भारताकडून अर्थसाहाय्य असलेल्या १५ विकास प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. भारत बांगलादेशमधील रस्ते, रेल्वे, वीज आदी प्रकल्पांमध्ये जवळपास ४.५ अब्ज डॉलर्सची मदत करणार आहे. चीनने बांगलादेशला आपल्या बाजूने वळवण्यासाठी मदत केल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताने हे पाऊल उचलले आहे.