इंधन दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. कच्च्या तेलाचे भडकलेले भाव याला कारणीभूत आहेत. आमच्या सरकारने महागाई कमी करण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. मात्र इंधनाचे वाढते दर सरकारच्या हातात नाहीत असे म्हणत भाजपाने हात झटकले आहेत. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारची बाजू मांडली आहे. २०१४ ला आम्ही सत्तेवर येण्याआधी यूपीएच्या काळात महागाईचा दर १०.४ टक्के होता जो आता ४.७ टक्क्यांवर आला आहे.

मनरेगा, पंतप्रधान आवास योजना यांसारख्या योजनांमध्ये जो काही खर्च होतो तो सरकारच्या तिजोरीतूनच होतो. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून देशहिताचेच निर्णय घेतले. मात्र आता इंधन दरवाढीमागे सरकारचा काहीही हात नाही. यामागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. जनतेलाही हे ठाऊक आहे. म्हणूनच काँग्रेस आणि विरोधकांच्या बंदला जनतेने फारसा प्रतिसाद दिलेला नाही.

देशात बंद करण्याचा, आंदोलन पुकारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र आज भारत बंदच्या नावाखाली बसेस पेटवल्या जात आहेत. पेट्रोलपंपांची तोडफोड केली जाते आहे. बिहारमध्ये अँब्युलन्समध्ये एका मुलाचा जीव गेला या सगळ्याची जबाबदारी कोणाची ? असाही प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी विचारला.