अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमि पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. अनेक व्हीआयपींना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा सुद्धा समावेश आहे.

“अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढणार आहे. त्याचा मनापासून आनंद होत आहे. राजकीय क्षेत्रातल्या धर्मनिरपेक्षतेच्या चुकीच्या कल्पना मोडून काढण्यात आडवाणीजींचे मौलिक योगदान विसरता येणार नाही. विद्यमान भारतामध्ये आडवाणींनी राजकीय हिंदुंचे पुनर्निर्माण केले” असे स्वपन दासगुप्ता यांनी म्हटले आहे. स्वपन दासगुप्ता पत्रकार असून राज्यसभेवर खासदार आहेत. वेगवेगळया इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी राजकारण, इतिहास या विषयांवर विपुल लेखन केले आहे.

पाहा फोटो >> मोदी, अडवाणी यांच्यासहित ५० व्हीआयपी, भल्या मोठ्या स्क्रीन्स; अयोध्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 

आणखी वाचा- “शरद पवार यांचा विरोध पंतप्रधान मोदींना नाही थेट प्रभू रामचंद्रांना”

करोना व्हायसरमुळे लांबणीवर पडलेल्या भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. भव्य पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला जाणार असल्याची माहिती राम मंदिर उभारण्याची जबाबदारी असणाऱ्या राम मंदिर ट्रस्टने दिली आहे. या कार्यक्रमासाठी ५० हून अधिक व्हीआयपी हजर असणार आहेत. संपूर्ण अयोध्येत सीसीटीव्ही स्क्रीन लावण्यात येणार आहेत जेणेकरुन भक्तांना कार्यक्रम लाइव्ह पाहता येईल अशी माहिती ट्रस्टने दिली आहे.