भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत देशाने एक महान आणि व्यासंगी नेता गमावला असल्याचे म्हटले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी मनला अत्यंत वेदना देणारी आहे. त्यांचे नेतृत्त्व अत्यंत प्रेरणादायी होते आणि पुढच्या पिढ्यांना ते कायम प्रेरणा देत राहिल असेही रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. तसेच त्यांची आठवण कधीही मनातून जाणार नाही. त्यांच्या जाण्याने देश शोकसागरात बुडाला आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या देशातील एक महान नेते होते. जनता पक्षाच्या प्रयोगानंतर फाटाफूट झालेल्या जनसंघापासून ते केंद्रात भाजपाच्या पहिल्या सरकारचे पंतप्रधान असा वाजपेयींचा राजकीय प्रवास झाला. त्यांनी तीनवेळा पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली. संघपरिवारातील भारतीय जनता पक्षाच्या उभारणीतील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. कृष्णबिहारी वाजपेयी व कृष्णादेवी वाजपेयी यांचे ते पुत्र होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ९३ वर्षीय वाजपेयी हे ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल होते.