17 February 2019

News Flash

श्रीलंकेत जाफना भागात आणखी एक छळछावणी

तामिळींसह नागरी युद्धातील कैद्यांचा या छावण्यांमध्ये छळ केला जात आहे.

माजी तामिळ लोकप्रतिनिधीचा दावा

श्रीलंकेच्या पूर्वेकडील भागांत छळछावणी असल्याचे संयुक्त राष्ट्रे तज्ज्ञांच्या पथकाने शोधल्यानंतर आता त्याच प्रकारची दुसरी छळछावणी उत्तरेकडील जाफना जिल्ह्य़ात आढळली आहे, असे एका माजी तामिळ लोकप्रतिनिधीने म्हटले आहे. तामिळींसह नागरी युद्धातील कैद्यांचा या छावण्यांमध्ये छळ केला जात असल्याचा आरोपही या लोकप्रतिनिधीने केला आहे.
तामिळ नॅशनल अलायन्सचे माजी संसदपटू सुरेश प्रेमचंद्रन यांनी या आठवडय़ात या छळछावणीचे छायाचित्र जारी केले असून त्यामध्ये एका घराच्या भिंतीवर असलेले रक्ताचे डागही स्पष्ट दिसत आहेत. श्रीलंकेच्या लष्कराकडून या घराचा कैद्यांच्या छळासाठी वापर केला जात असल्याचा दावा प्रेमचंद्रन यांनी केला आहे.
लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमच्या ताब्यातून १९९५ मध्ये जाफनाचा ताबा घेतल्यानंतर लष्कराने ही छळछावणी कायम ठेवली आहे.
मात्र लष्कराने अशा प्रकारची छळछावणी असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. अशा प्रकारची छळछावणी ठेवण्याची आम्हाला गरजच नाही आणि अशी छळछावणी अस्तित्वातच नाही, असा दावाही लष्कराने केला आहे.
पूर्वेकडील त्रिंकोमाली जिल्ह्य़ात अशी छळछावणी असल्याचा शोध संयुक्त राष्ट्रे तज्ज्ञांच्या पथकाने लावल्यानंतर प्रेमचंद्रन यांनी जाफनामध्ये अशी दुसरी छळछावणी असल्याचा दावा केला आहे. त्रिंकोमालीतील १२ खोल्यांच्या तुरुंगातील भिंतींवर खुणा आढळल्या आहेत
त्यावरून कैद्यांना २०१० पर्यंत येथे ठेवण्यात आल्याचे सूचित होत आहे.
संयुक्त राष्ट्रे कार्यकारी गटाने जे निष्कर्ष काढले आहेत त्याचा सरकारकडून गांभीर्याने तपास केला जात आहे, असे परराष्ट्रमंत्री मंगला समरविरा यांनी बुधवारी पार्लमेण्टमध्ये सांगितले.

First Published on December 4, 2015 2:13 am

Web Title: extrotion in lanka
टॅग Lanka