पठाणकोट दहशतवादी हल्ल्यामुळे लष्करी मदतीवर परिणाम
पाकिस्तानला आठ एफ १६ जेट विमाने विकण्यास अमेरिकी काँग्रेसने विरोध केला आहे, पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राने मंगळवारी अमेरिकी काँग्रेस व राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
एफ १६ विमानांचा पाकिस्तान सरतेशेवटी काय उपयोग करणार आहे, याची आम्हाला चिंता वाटते. त्यामुळे ही विमाने पाकिस्तानला विकण्याच्या योजनेबाबत त्याच्या पाठपुराव्याबाबत स्पष्टीकरण करतानाच सगळी माहिती देण्यात यावी, असे अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी म्हटले आहे.
एफ १६ जेट विमाने पाकिस्तानाला विकण्याच्या योजनेवर सिनेटने ओबामा प्रशासनाला ही विक्री रोखण्याचा आदेश मिळाल्याचे ‘डॉन’ने म्हटले आहे.
पठाणकोट आणि जम्मू हल्ल्यांत साधम्र्य : एनआयए
नवी दिल्ली : पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ला आणि मागील वर्षी जम्मूमध्ये झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांत राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) कमालीचे साधम्र्य आढळले आहे. पठाणकोट हल्ल्याचे धागेदोरे शोधण्यासाठी ‘एनआयए’च्या पथकाने जम्मूतील कथुआ आणि सांबा या ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. गेल्या वर्षी २० मार्च रोजी कथुआ येथील पोलीस ठाणे, तर २१ मार्च रोजी जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील सांबा येथील लष्करी छावणीला लक्ष्य करीत अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 3:35 am