जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे घुसखोरी करणारे पाकिस्तानचे एफ १६ हे लढाऊ विमान पाडण्यात भारताच्या हवाई दलाला बुधवारी यश आले होते. हे विमान पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन पडलं होतं. या विमानाचे अवशेष सापडले असून यासंबंधीचा फोटो समोर आला आहे. या फोटोत पाकिस्तानी अधिकारी विमान पडलेल्या ठिकाणी पाहणी करतानाही दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या 7 नॉर्थन लाइट इंफन्ट्रीचे कमांडिंग अधिकारी आहेत.

मंगळवारी बालाकोट येथे भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती. भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले. भारताला पाक हवाई दलाच्या ताफ्यातील एफ १६ विमान पाडण्यात यश आले होते.

मात्र यानंतर सोशल मीडियावर हाच फोटो भारताच्या मिग विमानाचा असल्याचं सांगत व्हायरल झाला होता. मात्र भारतीय हवाई दलाने हा फोटो पाकिस्तानच्या एफ16 विमानाचा असल्याची खातरजमा केली आहे.

भारताने पाकिस्तानचे एफ 16 लढाऊ विमान पाडले मात्र त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून सर्वोपतरी प्रयत्न सुरु आहे.

भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांना सहीसलामत भारतात आण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात असून हाच मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आहे. अभिनंदन यांना कोणतीही इजा झाली नाही पाहिजे, अशा सक्त शब्दांत केंद्राने इस्लामाबादला सांगितले असून पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्याशी योग्य वर्तणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले जाते.