वायर डॉट इन या इंग्रजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या एका लेखाला फेसबुककडून स्पॅम समजण्यात आल्याने अनेक नेटिझन्सनी गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. नेटिझन्सचा रोष लक्षात आल्यावर फेसबुककडून लगेचच हा लेख स्पॅममधून वगळण्यात आला आणि घडल्या प्रकाराबद्दल दिलगीरीही व्यक्त करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००३ मध्ये केलेल्या लंडन दौऱ्यावर इंग्लंडमधील भारताच्या माजी उप उच्चायुक्त सत्यव्रत पाल यांनी वायर डॉट इन या संकेतस्थळावर एक लेख लिहिला होता. या लेखाची लिंक फेसबुककडून स्पॅम म्हणून गणली गेल्याने नेटिझन्सना ती शेअर करता येत नव्हती. त्यामुळे वाचकांनी याबद्दल फेसबुक, ट्विटरवर रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. हा लेख स्पॅममधून तातडीने वगळावा, अशी मागणीही करण्यात येऊ लागली. फेसबुकने हा लेख स्पॅममधून वगळून एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, आमच्या स्पॅम फिल्टरमध्ये तो मजकूर चुकून अडकला. आता तो स्पॅममधून वगळण्यात आला आहे. झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो.