फेसबुकवर आता नव्याने खाते काढायचे असेल तर तुम्हाला आधारची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे, पण त्याची सक्ती केलेली नाही असे आता स्पष्ट झाले आहे. समाज माध्यमातील महत्त्वाचे संकेतस्थळ असलेल्या फेसबुकवर आधारची माहिती विचारण्यात आल्याचा स्क्रीनशॉट एका वापरकर्त्यांने रेडिटवर टाकला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये फेसबुकने आधारची माहिती विचारल्याचे दिसत आहे. वापरकर्त्यांचे नाव पहिले नाव, आडनाव हे आधारकार्डवर असेल तसेच सांगावे लागते. फेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी सांगितले, की आम्ही मर्यादित वापरकर्त्यांना ही माहिती केवळ चाचणीचा भाग म्हणून विचारत आहोत. जरी आधार कार्डची माहिती विचारण्यात येत असली तरी त्याची सक्ती करण्यात आलेली नाही. फेसबुकवर जे नाव आहे तेच नाव  लोकांनी सगळीकडे वापरावे असे आम्हाला वाटते व त्यामुळे मित्र व कुटुंबीय जोडले जाऊ शकतात. ही अगदी छोटी चाचणी आहे. यात अतिरिक्त भाषेची सोय दिली आहे. आधारची माहिती दिल्याने मित्र त्यांना फेसबुकवर लगेच ओळखू शकतील. लोकांनी फेसबुकवर जसे नाव आहे तसे आधारवर देण्याची सक्ती नाही असे प्रवक्त्याने सांगितले. सध्या तरी फेसबुक केवळ पहिले नाव व आडनाव विचारत आहे. आधारची सविस्तर माहिती विचारत नाहीत, त्यामुळे खासगीपणावर गदा आणलेली नाही असा कंपनीचा दावा आहे. पण फेसबुकने आधारची माहिती मागण्याच्या मुद्दय़ावर माघार घ्यायची नाही असे ठरवले आहे. भारतात फेसबुकचे महिन्याला २४.१० कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत, तर अमेरिकेत ही संख्या २४ कोटी आहे.