ख्राइस्टचर्च घटनेच्या पाश्र्वभूमीवर फेसबुकचे नियम अधिक कडक

पॅरिस : हिंसेच्या लाइव्ह स्ट्रिमिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेसबुकने त्यासंबंधीचे नियम अधिक कडक केले आहेत. न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथील मशिदींवर झालेल्या हल्ल्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले होते. त्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

दहशतवादाला खतपाणी घालणारा मजकूर आणि व्हिडीओ फेसबुक लाइव्हवर शेअर करून तिचा गैरवापर करणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. अशा व्हिडीओच्या प्रसारणावर नियंत्रण ठेवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे फेसबुकच्या इंटिग्रिटीचे उपाध्यक्ष गाय रोसेन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

समाजमाध्यमांचा वापर करून विद्वेषी आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा मजकूर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी अनेक देशांनी यापूर्वीच अशा कंपन्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. ख्राइस्टचर्च इथल्या हल्ल्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले होते आणि त्या संदर्भातला व्हिडीओ अनेकांनी शेअर केला होता. असे व्हिडीओ नियंत्रित ठेवण्यासाठी नियम तोडणाऱ्या वापरकर्त्यांचे खाते बंद केले जाईल.

न्यूझीलंडमधील धडा

न्यूझीलंडमधील हल्ल्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना मोठा मानसिक धक्का बसल्याचे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अ‍ॅर्डर्न यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे. त्यावर फेसबुकने न्यूझीलंडमधील हल्ल्यानंतर २४ तासांच्या आत दीड कोटींहून अधिक व्हिडीओच्या प्रती डिलिट केल्या होत्या. मात्र तरीही काही लोकांनी संपादित व्हिडीओसुद्धा प्रसारित केल्याने काही जणांना अजूनही हल्ल्याचे व्हिडीओ आढळून येतात. हेसुद्धा आमच्यासाठी आव्हान असून त्यावरही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रोसेन यांनी सांगितले.