इंटरनेट आणि सामाजिक माध्यमे ही राजकारण्यांना केवळ नागरिकांशी जोडणारीच नव्हे तर राजकारणात पारदर्शकता आणण्यास मदत करणारी माध्यमे आहेत, असे प्रतिपादन फेसबुकच्या मुख्याधिकारी शेरील सँडबर्ग यांनी येथे केले. फेसबुक व ट्विटरसह अनेक सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक राजकारणी करीत आहेत. याद्वारे जनमानसाशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा संदर्भही शेरील यांनी येथे दिला.
राजकारण्यांनी अधिकृतपणे सामाजिक प्रसारमाध्यमांवर सक्रिय राहावे यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यावर त्यांना त्यांच्या उपक्रमांविषयी अधिकाधिक बोलते केले पाहिजे. इंटरनेट हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या फेसबुक अनुयायांची संख्या १ कोटी ८० लाख असून त्यांच्यापेक्षा केवळ अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याच फेसबुक अनुयायांची संख्या अधिक आहे, असे निरीक्षण शेरील सँडबर्ग यांनी नोंदवले. देशाच्या कायद्यांनीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखला पाहिजे. त्यांनी अशा अभिव्यक्तींना पुरेसे व आवश्यकतेनुसार संरक्षणही पुरविले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.