फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला भोपाळ कोर्टाने समन्स बजावले आहे. एका स्टार्टअप संदर्भातल्या तक्रारीनंतर फेसबुक आणि मार्क झुकेरबर्गला हे समन्स बजावण्यात आले आहे. फेसबुकवरून डेटा लीक झाल्याची चर्चा जगभरात रंगली आहे. तसेच दररोज या सोशल नेटवर्किंग साईट्समधील उणिवांवरही बरीच चर्चा सोशल मीडियात रंगातना दिसते. अशात आता भारतातही या प्रकरणावरून वाद सुरु झाले आहेत.

भोपाळ येथील एका स्टार्ट अप कंपनीने कोर्टाचा दरवाजा ठोठावत बुधवारी आपला तक्रार अर्ज दाखल केला. http://www.thetradebook.org च्या माहितीनुसार फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन, व्हॉट्स अॅप हे सगळे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म पश्चिमेकडील देशातून आले आहेत. तर चीनमधून अलीबाबा हा ग्लोबल प्लॅटफॉर्मही जगाला मिळाला आहे. मात्र भारताकडून अशा कोणत्याही ग्लोबल प्लॅटफॉर्मची निर्मिती झालेली नाही. याचाच विचार करत http://www.thetradebook.org नावाची नवी कल्पना भारतात सुरु करण्याचा विचार सुरु झाला. जेणेकरून भारताकडून जगाला एक ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळेल.

बुधवारी भोपाळच्या जिल्हा न्यायालयात ट्रेड बुकच्या संस्थापकांनी फेसबुक विरोधात तक्रार दाखल करत मार्क झुकेरबर्ग आणि फेसबुक यांनी ट्रेड फिडचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. आपल्या वकिलांमार्फत कायद्याचे नियम धुडकावून लावत आम्हाला काही नोटीसा पाठवण्यात आल्या. आम्हाला त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला. याबाबत विचार झाला पाहिजे असे न्यायालयाला ट्रेड बुकच्या संस्थापकांनी सांगितले. ज्याची दखल घेत न्यायालयाने या प्रकरणी फेसबुक आणि मार्क झुकेरबर्गला समन्स बजावले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जून रोजी होणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रेड बुकच्या संस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही एका वेगळ्या संकल्पनेवर काम करतो आहोत. या संकल्पनेनुसार आम्ही नेटवर्क एन्हवॉरमेंटमधून ट्रेड आणि बिझनेसशी संबंधित फीड निर्मित करून ते युजर पर्यंत पोहचवतो. ट्रेड फिड हा भारतीय ट्रेड मार्क आणि पेटेंट ऑफिसमधील रजिस्ट्रर्ड मार्क आहे. ज्यानुसार ट्रेड फिड सही ऑनलाइन ट्रेडसंदर्भातली माहिती, सगळे ट्रेड अपडेट्स सोशल नेटवर्किंगवर पब्लिश केले जातात. व्यापार एकमेकांशी जोडला जातो.

ट्रेड बुकने दिलेल्या माहितीनुसार फेसबुकने आमचा नोंदणीकृत ट्रेड मार्क ट्रेड फिडचे उल्लंघन केले आहे. ट्रेड नेटवर्किंगबाबत स्वप्निल राय गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. २०१५ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा मी स्वतः फेसबुकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही.

काही दिवसांनी फेसबुकचे संचालक आर्ची बोंग यांच्यासोबत आपली भेट झाली, त्यांना आपण आपली संकल्पना सांगितली असेही स्वप्निल यांनी म्हटले आहे. तुम्ही तुमच्या संकल्पनेबाबत सविस्तर इ मेल करा असे स्वप्निल यांना सांगण्यात आले. मात्र जेव्हा ट्रेड बुक इंडियन ट्रेड मार्क ऑफिसने छापलेल्या जनरलमध्ये ही माहिती प्रकाशित झाली तेव्हा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गने आपल्याला धमक्या द्याला सुरुवात केली असे स्वप्निल यांनी स्पष्ट केले. या सगळ्यानंतर आम्हीही तक्रार केली ज्यानंतर झुकेरबर्ग यांना समन्स पाठवण्यात आले आहे.