फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरून लक्षावधी ‘पाठिराखे’ असल्याचे दावे करून चमकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांवर आता या संकेतस्थळांची वक्रदृष्टी पडली आहे. फेसबुकवर बनावट खाती (अकाउंट) तयार करून त्याद्वारे ठरावीक नेत्यांचे लक्षावधी ‘पाठिराखे’ असल्याचे भासवणारे अकाउंट्स आता हद्दपार करण्यास फेसबुकने सुरुवात केली आहे.
सोशल नेटवर्किंग साइट्सना भारतातून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून राजकीय पक्ष व नेतेमंडळी या माध्यमातून तरुणवर्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तर सोशल मीडिया हे प्रचाराचे मुख्य माध्यमच बनले आहे. परंतु, यापैकी अनेक पक्षांच्या/नेत्यांच्या फेसबुक पेजेसवर येणाऱ्या प्रतिक्रिया व लाइक्स बनावट खात्यांवरून आल्याचे फेसबुकच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे अकाउंट्स हद्दपार करण्यास फेसबुकने सुरुवात केली आहे.
फेसबुककडे उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील विविध राजकीय पक्ष व नेत्यांचे ५२००० पेजेस या संकेतस्थळावर कार्यान्वित आहेत. मात्र, यापैकी केवळ ६० पेजेसच अधिकृत असल्याचे आढळून आले आहे. भारतामध्ये फेसबुकचे जवळपास ९.३० कोटी मासिक वापरकर्ते आहेत.  परंतु, यातील असंख्य  वापरकर्ते बनावट असल्याने फेसबुकने आता कारवाई सुरू केली आहे. बनावट खाती शोधून काढणारी स्वयंचलित आणि मानवी देखरेख यंत्रणा फेसबुकने विकसित केली आहे. यासंदर्भात फेसबुकने काही संगणकीकृत नियम तयार केले असून बनावट खातेधारक नवीन नोंदणी करताना, ‘लाइक’ करताना किंवा प्रतिक्रिया देताना लगेच उघडकीस येतात.

जास्तीतजास्त लोकांना आपले विचार मांडण्याची संधी देण्याचा आणि जगाला मुक्तसंवादाचे व्यासपीठ बनवण्याचे ‘लक्ष्य’ आम्ही ठेवले आहे. यंदाच्या निवडणुकीत विविध पक्षांच्या उमेदवारांना आपले विचार मतदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी देऊन देशाच्या राजकीय रचनेमध्ये फेसबुकचे स्थान भक्कम करण्यावर आमचा भर आहे.
अनखी दास, संचालक (भारत व दक्षिण आशिया सार्वजनिक धोरण) फेसबुक

सोशल मीडियाचा प्रभाव
‘आयआरआयएस’ नॉलेज फाउंडेशन आणि इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, यंदाच्या निवडणुकीतील जवळपास १६० मतदारसंघांमधील निकाल सोशल मीडियावरील चर्चानी प्रभावित झालेले असतील.

फेसबुकवरील सुपर‘लाइक’ नेते
* नरेंद्र मोदी १.२ कोटी
* अरविंद केजरीवाल ४८ लाख  
* ममता बॅनर्जी    ६.७० लाख
* अखिलेश यादव    ४.७५ लाख