फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटने २०१८ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये जवळपास ५८ कोटी ३० लाख फेक अकाऊंट्स बंद केले आहेत. फेसबुकच्या कम्यूनिटी स्टँडर्डचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटनमधील कंपनीने ८७ दशलक्ष फेसबुक युजर्सची माहिती चोरल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने काही दिवसांपूर्वीच जवळपास २०० अॅप्स हटवले होते. फेसबुकवरील या अॅप्सच्या माध्यमातून व्यक्तीगत माहितीचा गैरवापर केल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली होती.

आता फेसबुकने फेक अकाऊंट्स आणि फेक पोस्टसंदर्भातही कठोर पावले उचलली आहेत. २०१८ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये फेसबुकने तब्बल ५८ कोटी ३० लाख फेक अकाऊंट्स बंद केले आहेत. याशिवाय प्रक्षोभक विधाने असलेली २० लाख पोस्ट, दहशतवाद पसरवणारे १० लाख पोस्ट आणि हिंसाचाराचे जवळपास ३० लाख व्हिडिओ देखील फेसबुकने हटवले आहेत.